गावठी पिस्तूल, आठ जिवंत काडतुसासह दोघांना अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । बांभोरी येथील दोन तरुणांना एक गावठी पिस्तूल व आठ जिवंत काडतुसासह स्थानिक गुन्हे शाखेने आज तालुक्यातील आव्हाणे येथून अटक केली आहे.

सागर देवीदास सोनवणे व भास्कर अशाक नन्नवरे दोन्ही रा. बांभोरी ता. धरणगाव अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. बांभोरी येथील दोन तरुणांकडे विना परवाना गावठी पिस्तूल तसेच जीवंत काडतुस असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक

किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अनिल जाधव, अशरफ शेख, दिपककुमार शिंदे, विजय चौधरी यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या. पथकाने गुरुवारी संशयितांची माहिती काढली. दोघेही संशयित जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने आव्हाण येथे सापळा रचुन दोघांना अटक केली.

चौकशीत संशयित सागर सोनवणे यांच्याकडे गावठी कट्टा व दोन जीवंत काडतुस तर भास्कर नन्नवरे यांच्याकडे ६ जीवंत काडतुस मिळून आले. दोघांकडून गावठी कट्टयासह काडतुस तसेच दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Protected Content