अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीतील मानधन अद्याप न मिळाल्याने मोतीराळे येथील ग्रामरोजगार सहाय्यकांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. पंचायत समिती स्तरावर दिनांक 2 एप्रिल रोजी हे मानधन प्राप्त झालं असतानाही, आजपर्यंत संबंधित सहाय्यकांना प्रत्यक्षात रक्कम वितरित झालेली नाही.
या संदर्भात संघटनेमार्फत निवेदन देण्यात आलं असून, त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे की, “ग्रामरोजगार सहाय्यकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत नियमितपणे काम केलं आहे. मात्र, सहा महिन्यांपासून मानधन थकलेलं आहे. शासन स्तरावरून निधी प्राप्त असूनदेखील तालुका स्तरावर वितरणास विलंब होत आहे, त्यामुळे सहाय्यकांना जगण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.”
या परिस्थितीमुळे सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. “जोपर्यंत थकीत मानधन आमच्या खात्यावर जमा होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील,” असा ठाम निर्धार सहाय्यकांनी व्यक्त केला आहे.
सध्या तालुक्यातील तब्बल 119 ग्रामपंचायतींमधील ग्रामरोजगार सहाय्यक काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी सहाय्यकांनी केली आहे.