विक्रम लँडरशी संपर्क तुटला

vikram lander fail

बंगळुरू वृत्तसंस्था । संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणार्‍या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडरशी २.१ किलोमीटर आधीच संपर्क तुटल्याने सर्व जण स्तब्ध झाले आहेत. तर पंतप्रधानांनी वैज्ञानिकांचे कौतुक करून त्यांना धीर न सोडण्याचा सल्ला दिला आहे.

रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. एक वाजून ५३ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर लँडिंग करणार होते. मात्र, चांद्रयान अवघे २.१ कि.मी.वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला. इस्त्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी याची माहिती यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.
दरम्यान, यामुळे वैज्ञानिक निराश झाले असले तरी पंतप्रधानांनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले की, जीवनात चढ-उतार येत असतात. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही विज्ञानाची आणि पर्यायाने देशाची सेवा केली आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेसाठी खडतर मेहनत घेतली आहे. आतापर्यंत तुम्ही यशस्वी कामगिरी केली आहे. धीर सोडू नका. संपर्क तुटला म्हणून खचून जाऊ नका. तुम्ही केलेले काम छोटे नाही. इस्त्रो प्रमुखांनी पुन्हा संपर्क होऊ शकतो, असे सांगितले आहे. तुमच्या मेहनतीनेच पुन्हा एकदा देशाची मान उंचावेल. पुढील कामगिरीसाठी तुम्हाला शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!