
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जळगाव शहरातील छत्रपती शाहू महाराज नगर शाखेत भव्य विजयादशमी उत्सव संपन्न झाला. विजयादशमी हा दिवस भारतीय सनातन हिंदू संस्कृतीतील पराक्रम, शौर्य आणि धर्माच्या विजयाचा प्रतीक दिन असून, हाच संघाचा स्थापना दिवसही आहे. या निमित्ताने रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवाचा प्रारंभ दुपारी ४ वाजता प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार चौक (स्टेट बँक जवळ) येथून शिस्तबद्ध संचलनाने करण्यात आला. नगरातील स्वयंसेवक पूर्ण गणवेशात, तर सज्जनशक्ती आणि मातृशक्ती मंगलवेशात उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. संचलन शहराच्या प्रमुख मार्गांवरून होत अनुव्रत भवन येथे समारोप झाला. संचलनादरम्यान घोष, संघगीत, अनुशासन व समर्पणाचे दर्शन नागरिकांना घडले.
उत्सवाचे मुख्य कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता अनुव्रत भवन येथे पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुशिल गुजर (एम.डी. मेडिसिन) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. स्वानंद झारे (देवगिरी प्रांत सहकार्यवाह) यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “संघ हे एक सामाजिक-सांस्कृतिक चळवळ आहे ज्याचे कार्य समाजघटन, राष्ट्रभक्ती आणि चारित्र्यनिर्माणावर आधारित आहे. संघाच्या शताब्दी वर्षात प्रत्येक स्वयंसेवकाने पंच परिवर्तन (कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, समरसता, स्वदेशी, नागरिक कर्तव्य) आचरणात आणण्याचा संकल्प करावा.”
डॉ. गुजर यांनी आपल्या मनोगतात संघकार्याच्या सामाजिक परिणामांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “समाजातील सज्जन शक्ती एकत्र येऊन जर संघटित झाली, तर भारत पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोहोचू शकतो. संघ हे केवळ शाखेपर्यंत मर्यादित नसून त्याचा प्रभाव संपूर्ण जीवनावर आणि राष्ट्रनिर्मितीवर आहे.”
कार्यक्रमाचे आयोजन नगर कार्यवाह चेतन तारकस आणि नगर सहकार्यवाह हितेंद्र टेकावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शहरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ स्वयंसेवक व तरुणांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेत राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडविले.
विजयादशमीच्या निमित्ताने संघाच्या शताब्दी वर्षात जळगावात झालेला हा उत्सव एकजुटीचा, संस्कारांचा आणि प्रेरणेचा संदेश देणारा ठरला. संघटनेच्या मूल्यांवर आधारित हा उत्सव शहरातील नागरिकांना संघाच्या व्यापक कार्याचा परिचय करून देणारा झाला.



