हाजीपूर, वृत्तसंस्था | पाकिस्तानचे दहशतवादी व घुसखोरांना पाठबळ देण्याचे उद्योग सुरू असून, अनेकादा भारताने याविरोधात केलेल्या कारवाईने नुकसान होऊनही पाकिस्तानच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याचे दिसत आहे. भारतीय जवानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) च्या १५ सैनिकांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. १२ व १३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानकडून हाजीपूर सेक्टरमध्ये हा घुसखोरीचा प्रयत्न केला गेला होता. मात्र भारतीय जवानांनी या घुसखोरांवर ग्रेनेड हल्ले करून त्यांचा खात्मा केला. जवानांच्या या धाडसी कारवाईचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा एकदा जगासमोर उघड झाल्या आहेत.
काश्मीरमध्ये सुरू असलेल्या ‘ऑपरेशन ऑलआउट’ने दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. जवानांनाकडून पाकिस्तानी ‘बॅट’च्या घुसखोरांचे प्रयत्न उधळून लावले जात आहेत. कलम ३७० हटवण्यात आल्यापासून चवताळलेला पाकिस्तान कायम काहीना काही कुरापती करत आहे. ऑगस्टमध्येही पाकिस्तानकडून एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न केला गेला होता. जो भारतीय जवानांनी उधळून लावला होता.
विशेष म्हणजे दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत व्हावी म्हणून पाकिस्तानी सेनेकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. हेच कारण आहे की महिनाभरापासून सीमारेषेवर सातत्याने गोळीबार सुरू आहे. प्रमुख दहशतवाद्यांचा भारतीय जवानांकडून खात्मा करण्यात आल्याने व काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त केला जात असल्याने पाकिस्तान काहीसा आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पाकिस्तानातील प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी पावसाळ्यात विशेष प्रयत्न केले गेल्याचे दिसून आले आहेत, मात्र त्यांचे हे सर्व प्रयत्न भारतीय जवानांनी अपयशी ठरवले आहेत.