लँडर विक्रमबद्दल आज ‘नासा’च्या मदतीने माहिती मिळणे शक्य

Pragyaan

बंगळुरू, वृत्तसंस्था | चंद्रावर हार्ड लँडिंग करणाऱ्या विक्रम लँडरबद्दल आज माहिती मिळणे अपेक्षित आहे. कारण ‘नासा’ने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर आज विक्रमने हार्डलँडिंग केले त्या भागातून जाणार आहे. त्यावेळी नासाच्या ऑर्बिटरकडून मिळणाऱ्या फोटोंमधून विक्रम लँडरची नेमकी स्थिती स्पष्ट होणार आहे.

 

“विक्रम लँडरबद्दल शेअर करण्यासाठी काहीही नवी माहिती नाहीय, पण काहीही नवीन अपडेट किंवा फोटो असेल तर तो आमच्या वेबसाइटवर अपलोड करु” असे इस्रोने म्हटले आहे. विक्रमने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग का केले नाही? हार्ड लँडिंगमागे काय कारण आहे? हे शोधून काढण्यासाठी इस्रोने स्थापन केलेली अंतर्गत समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे. पुढच्या दोन दिवसात हा अहवाल सादर होईल. या समितीच्या काही बैठका झाल्या असून त्यांनी त्यातून निष्कर्ष काढला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. लवकरच हा अहवाल सार्वजनिक करण्यात येणार आहे.

७ सप्टेंबरच्या रात्री विक्रमने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित होते. पण चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतरही विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी ‘नासा’चीही मदत घेण्यात आली. पण अजून संपर्क होऊ शकलेला नाही. आता तीन दिवसांपेक्षाही कमी वेळ उरला आहे. चंद्रावर २१ सप्टेंबरनंतर रात्र सुरु होईल. लँडर आणि त्यामध्ये असलेल्या प्रग्यान रोव्हरची रचना १४ दिवस काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती.

दरम्यान, ‘नासा’ही इस्रोच्या मदतीसाठी पुढे आली आहे. नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर सध्या चंद्राभोवती भ्रमण करत आहे. नासाच्या या (एलआरओ) चंद्र मिशनची सुरुवात १८ जून २००९ साली झाली होती. अॅटलस व्ही रॉकेटने ऑर्बिटरचे प्रक्षेपण करण्यात आले होते. पाच दिवसांनी २३ जूनला नासाच्या ऑर्बिटरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. १५ सप्टेंबर २००९ ला ऑर्बिटरने आपले शोध कार्य सुरु केले. चंद्रावर खनिज असलेल्या साधन संपत्तीच्या जागा, अनुकूल प्रदेश, भविष्यात रोबोटिक आणि मानवी मोहिमांसाठी अनुकूल पर्यावरण याविषयी माहिती गोळा करण्यात आली.

Protected Content