विदर्भ तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचा विजेता

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | करुण नायरच्या भक्कम शतकाच्या जोरावर विदर्भने तिसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं. संपूर्ण हंगामात अपराजित राहून विदर्भने जेतेपदाचे खरे दावेदार असल्याचं सिद्ध केलं. अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भने २४९/४ वरून पुढे खेळायला सुरुवात केली. नियमित अंतराने विकेट्स गमावत असतानाही धावसंख्या वाढवत त्यांनी आघाडी मजबुत केली आणि केरळच्या विजयाच्या शक्यता मावळत गेल्या.

करुण नायरने १० चौकार आणि २ षटकारांसह १३५ धावांची मॅरेथॉन खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ७/२ अशा बिकट परिस्थितीत खेळायला आलेल्या करुणने संयमी फलंदाजी करत शतक झळकावलं. पहिल्या डावात धावचीत होण्याचं शल्य त्याने या खेळीद्वारे भरून काढलं. पहिल्या डावातील शतकवीर दानिश मालेवारने ७३ धावांची खेळी करत करुणला तोलामोलाची साथ दिली.

यश राठोड (२४), अक्षय वाडकर (२५), अक्षय कर्णेवार (३०) आणि दर्शन नालकांडे (५१) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी करत संघाच्या आघाडीत भर टाकली. विदर्भने दुसऱ्या डावात ३७५ धावा करत मजबूत स्थिती निर्माण केली. अखेरीस, दोन्ही कर्णधारांच्या संमतीनंतर सामना अनिर्णित घोषित करण्यात आला आणि विदर्भच्या संघाने विजयी जल्लोष साजरा केला.

पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या केरळने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. विदर्भच्या पहिल्या डावाची सुरुवात अडचणीची ठरली, २४/३ अशी स्थिती असताना मालेवार आणि करुण नायर यांनी चौथ्या विकेटसाठी २१५ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मालेवारने १५ चौकार आणि ३ षटकारांसह १५३ धावांची जबरदस्त खेळी केली, तर करुण ८६ धावांवर बाद झाला. नचिकेत भुटेने अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करत ३२ धावा जोडल्या. केरळकडून निधीश आणि एडन अॅपल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

केरळने दुसऱ्या डावात ३४२ धावांची मजल मारली, पण विदर्भला पहिल्या डावातील महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. केरळ संघात दाखल झालेल्या आदित्य सरवटेने ७९ धावा करत संघाला मजबुती दिली. कर्णधार सचिन बेबीचं शतक अवघ्या २ धावांनी हुकलं. विदर्भकडून दर्शन नालकांडे, हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. सामन्याचं पारडं दोलायमान असताना विदर्भच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं.

विदर्भला ३७ धावांची आघाडी मिळाली होती, पण दुसऱ्या डावात त्यांचीही सुरुवात खराब झाली. मात्र, करुण नायर आणि दानिश मालेवार यांनी जबरदस्त संयम दाखवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या ऐतिहासिक विजयासह विदर्भने आपली क्रिकेटमधील मजबूत पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

 

 

 

 

 

 

Protected Content