फुले-आंबेडकर संयुक्त सार्वजनिक उत्सव समिती कार्यकारणी गठीत

दीपनगर ता.भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दीपनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव 2025 साजरा करण्यासाठी नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता नवीन क्रीडाभवन येथे मुख्य अभियंता श्री. प्रफुल्ल भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

बैठकीत माजी सचिव मनिष चवरे यांनी मागील वर्षाचा लेखाजोखा सादर केला, जो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यानंतर, पदसिद्ध अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल भदाणे यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी नवीन प्रकल्पाचे मुख्य अभियंता शशांक चव्हाण यांची निवड झाली. सचिव म्हणून मोहित कांबळे, खजिनदार म्हणून रोशन बाऱ्हे, तसेच उपाध्यक्ष व संयोजक म्हणून मुकेश मेश्राम यांची निवड झाली. सहसंयोजकपदी सुधाकर वासुदेव, सहसचिव म्हणून संघपाल निकम, प्रशांत वाघ आणि निलेश पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. सहखजिनदारपदी संतोष वानखेडे, शिवाजी परदेशी, सुभाष मेश्राम यांची निवड झाली, तर अंतर्गत हिशोब तपासणीस म्हणून मिलिंद खंडारे आणि मनोहर बाऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.

नवनियुक्त सचिव मोहित कांबळे यांनी सर्व उपस्थितांना जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल भदाणे यांनी प्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य मिळेल, याची ग्वाही दिली. तसेच, जयंती उत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीस उपमुख्य अभियंता अशोक भगत, रवींद्र सोनकुसरे, कार्यकारी अभियंता महेश तांबे, कल्याण अधिकारी सुधाकर वासुदेव यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोशन वाघ यांनी केले.

Protected Content