चंदीगढ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महिला मल्ल विनेश फोगटचा हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत विजय झाला आहे. कुस्तीच्या मैदानातून राजकीय आखाड्यात उतरलेली विनेश फोगट आता विधानसभेचं मैदान गाजवणार हेच तिने तिच्या विजयानंतर दाखवून दिले आहे. कुस्तीपटू आणि विनेशचा सहकारी बजंरग पुनियाने तिच्या विजयची पोस्ट केली आहे.
देश की बेटी, विनेश फोगट को बहुत बधाई! अशी ओळ बजरंग पुनियाने लिहिली आहे. तसंच बजरंग पुनियाने म्हटले आहे की ही लढाई म्हणाजे जुलानाच्या एका जागेसाठी झालेली लढाई नाही किंवा फक्त पक्षांशी, उमेदवारांशी नव्हती. ही लढाई देशात दडपशाही आणणाऱ्यांच्या विरोधात होती. या आशयाची पोस्ट बजरंग पुनियाने केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मिरवणूक काढून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता. या मिरवणुकीत भाषण करत असताना विनेश फोगट म्हणाली होती, “खेळाच्या मैदानात तुम्ही सर्वांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. आता मी एका नव्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. मी विधानसभेत मी जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेन. महिला, वृद्ध, मातांना मी आश्वासन देऊ इच्छिते की तुम्ही आता चिंता करू नका, तुमची मुलगी येत आहे.” तिने हे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे ती जिंकली आहे.