व्हि. डी. पाटील यांच्या नावाने अजय बढेंना धमकी : अदखलपात्र गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेततळ्यांचे काम मिळवून देण्यासाठी व्हि. डी. पाटील आणि इतरांनी आपली ४५ लाखांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप करणारे कंत्राटदार अजय भागवत बढे यांना आज याच प्रकरणातील एका संशयिताने श्री पाटील यांच्या नावाने धमकावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, कंत्राटदार अजय भागवत बढे यांना तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत शेततळ्यांचे काम मिळवून देण्यासाठी आठ जणांनी सुमारे ४५ लाख रूपयांमध्ये फसवणूक केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणी बढे यांनी जळगाव न्यायालयात धाव घेतल्यानंतर आठ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या संदर्भात तीन दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेऊन अजय बढे यांनी विस्तृत माहिती दिली होती. या संशयितांमध्ये तापी महामंडळाचे सेवानिवृत्त अभियंता तथा माजी विभागीय माहिती आयुक्त व्हि. डी. पाटील यांच्या नावाचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, यानंतर आज सकाळी अजय बढे यांच्या स्मार्टफोनवर व्हाटसअप मॅसेज करून पंकज नेमाडे यांनी त्यांना धमकावले. व्हि.डी. पाटील कोण आहे ? हे तुला माहित असून देखील तू त्यांच्या विरूध्द तक्रार दिल्यामुळे याचे परिणाम तुला भोगावे लागतील अशा आशयाचा हा मॅसेज होता. अजय बढे यांनी हा मॅसेज वाचल्यानंतर नेमाडे यांनी हा मॅसेज डिलीट करून टाकला. या संदर्भात अजय बढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जळगाव शहर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content