सचिन वाझे यांना १० दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई:  वृत्तसंस्था । मनसुख हिरेन हत्याकांडातील आरोपी  सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 

आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा मार्ग मोकळा झाला आहे.  ‘एनआय’च्या वकिलांनी सचिन वाझे यांची 14 दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी शनिवारी NIA ने सचिन वाझे यांनी तब्बल 13 तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर ‘एनआयए’ने सचिन वाझे यांना अटक केली होती.

 

त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत एनआयए सचिन वाझे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर काढणार, हे पाहावे लागेल. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात याप्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

 

 

तर दुसरीकडे एनआयएच्या कार्यालयात सचिन वाझे यांचे सहकारी असलेल्या CIU युनिटमधील चार अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. यापैकी वाझेंचे सहकारी रियाझ काझी यांची पाच तासांपेक्षा अधिक काळापासून चौकशी सुरु आहे. त्यामुळे आता एनआयए आता आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेणार का, हे पाहावे लागेल.

 

उद्योगपती असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्या मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या  असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे यांच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली. सचिन वाझे यांनी स्वत:च राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना या इनोव्हा कारबद्दल माहिती दिली. त्यानंतर NIA ने ही कार ताब्यात घेऊन कार्यालयात आणली.

 

याशिवाय, अंबानी यांच्या घराबाहेर ज्या कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती, ती स्कॉर्पिओ कारही पोलिसांचीच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हीच स्कॉर्पिओ गाडी अन्वय नाईक प्रकरणातील आरोपी अर्णव गोस्वामी यांना अटक करताना वापरण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. त्यावेळी या गाडीवर बनावट नंबरप्लेट लावण्यात आली होती. या नव्या माहितीमुळे आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरण आणि अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटक प्रकरणातील संशयाचे धुके आणखी वाढले आहे.

Protected Content