‘कुंभमेळा कोरोना’ वरून भाजपचे मुख्यमंत्री आपसात ‘भिडले’

 

 

हरिद्वार : वृत्तसंस्था । उत्तरखंडमधील हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यामध्ये कोरोना चाचण्यांचा घोटाळा झाल्याचं समोर आल्यानंतर आता राज्यातील आजी आणि माजी मुख्यमंत्री आमने-सामने आल्याचं चित्र  आहे.

 

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी हा घोटाळा म्हणजे खूनाचा प्रयत्न असल्यासारखाच गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच सध्याचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी, आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वीची ही घटना असल्याचे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्रिवेंद्र यांचं हे विधान वादाला कारण ठरु शकतं.

 

डेहराडून येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या १५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी १७ जून रोजी तिरथ सिंह रावत यांना या घोटाळ्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “ही बाब मी मुख्यमंत्री होण्यापूर्वीची आहे, परंतु यात दोषींवर कडक कारवाई केली जाईल. चौकशी सुरू केली असून दोषींनाही सोडले जाणार नाही”, असे तिरथ सिंह यांनी सांगितले होते. म्हणजेच हा घोटाळा त्रिवेंद्र सिंह यांच्या कालावधीमध्ये झाल्याचा इशारा तिरथ सिंह यांनी केला होता.

 

याच संदर्भात आता माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांनी अप्रत्यक्षपणे सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधालाय. कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या खोट्या चाचण्या या हत्येचा प्रयत्न करण्यासारखा गंभीर गुन्हा आहे. मुख्यमंत्र्यांनी न्यायलयीन चौकशीचे आदेश दिले पाहिजेत. तसेच हा घोटाळा नक्की कधी झाला हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे,” असं त्रिवेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

 

 

त्रिवेंद्र सिंह यांनी केलेल्या मागणीमुळे आता भाजपाच्याच आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान या घोटाळ्यामध्ये  आरोग्य विभागाने ज्या मॅक्स कॉर्परेट नावाच्या कंपनीला एक लाख चाचण्यांचं कंत्राट दिलं होतं ती कंपनीच अस्तित्वात नसल्याची माहिती समोर आली आहे. मॅक्स कॉर्परेट कंपनी केवळ कागदावर असल्याचा खुलासा झालाय. बनावट कंपनीला कुंभमेळ्यामधील चाचण्यांचं कंत्राट देण्यात आल्याचं उघड झाल्याने कुंभमेळा आयोजनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

 

समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीची नोंदणी ज्या पत्त्यावर झालीय त्या ठिकाणी कोणताही कंपनी अस्तित्वात नाहीय.  प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तपास समितीची स्थापना केलीय.  दुसरीकडे कुंभमेळ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही आपल्या बाजूने एका समितीची स्थापना करुन तपास सुरु केलाय. कुंभमेळ्यातील आरोग्य अधिकारी डॉ. अर्जुन सिंह सेंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने सर्व खासगी प्रयोगशाळांसोबत करार केला होता. मात्र दिल्लीमधील लाल चंदानी लॅब आणि हिस्सारमधील नालवा प्रयोगशाळेसोबत थर्ड पार्टी करारानुसार कंत्राट देण्यात आलं होतं.

 

हरिद्वारचे जिल्हाधिकारी सी. रविशंकर यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार तपासादरम्यान खासगी प्रयोगशाळांच्या काराभारामध्ये अनेक ठिकाणी नियोजनामधील गोंधळ दिसून आला. यामध्ये दुसऱ्या शहरांमधील नावांचा वापर करणे, एका ओळखपत्रावर अनेकदा चाचण्या झाल्याचं दाखवणं आणि एकाच प्रयोगशाळेत मोठ्या संख्येने चाचण्या करण्यात येणं यासारख्या प्रकरणाचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून १० दिवसांमध्ये अहवाल सादर केला जाणार आहे. गोंधळ असल्याचं सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

 

Protected Content