जळगाव प्रतिनिधी । आ. एकनाथराव खडसे यांच्या पुढाकाराने मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयात राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे सन २०१५ मध्ये जळगाव जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या अधिसभेत मंजूर करून शासनाकडे पाठवण्यात आला होता. या महाविद्यालयासाठी केंद्र शासनाच्या निकषानुसार १०० एकर जागा आवश्यक असल्याने जळगाव जिल्ह्यामध्ये शासकीय जागेचा शोध जिल्हाधिकारी, जळगाव कार्यालयामार्फत सुरू होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने ३-४ ठिकाणी शासकीय जागा तसेच खाजगी जागा प्रस्तावित केल्या होत्या; परंतु जागा उपलब्ध होत नसल्याने अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या मालकीची १०० एकर जागा या महाविद्यालयास विनामुल्य दराने उपलब्ध करून दिल्याने हा अडसर दूर झाला असून यामुळे राज्य शासनाने हा महाविद्यालयात मान्यता दिली आहे.
या महाविद्यालयास अंदाजे ५० कोटी इतका खर्च येणार आहे. येथे पशुवैद्यकीय चाचणी, पशुशल्यचिकित्सा, पशुधन विकास, वैरण विकास इत्यादी सोयीसुविधा स्वस्त व शासकीय दरात उपलब्ध होणार आहेत. याचबरोबर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये फिरते पशुवैद्यकीय अॅम्ब्युलन्स उपलब्ध होणार आहे. दरम्यान, राज्यात सध्या फक्त मुंबई, शिरवळ, परभणी, उदगीर, नागपूर, अकोला या सहा ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू आहेत. यामुळे सालबर्डी येथील महाविद्यालय हे राज्यातील सातवे ठरणार आहे.