मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्येष्ठ साहित्यिक महादेव विठ्ठल मोरे यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. मराठी साहित्य विश्वात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आठ भाऊ, तीन बहिणी, तीन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
महाराष्ट्र शासनाने चिताक या कथासंग्रहासाठी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच सातारा प्रतिष्ठाननेही जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. आशिया खंडात गाजलेल्या तंबाखू आंदोलनावर त्यांनी झोंबड हा कथासंग्रह लिहिला होता. तो त्या काळी फार गाजला होता. त्यांचे आत्तापर्यंत 16 कथासंग्रह, कादंबऱ्या, 4 ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी अनेक साप्ताहिकांसाठीही लिखाण केले. महादेव मोरे यांचे महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील ज्येष्ठ तसेच नवीन साहित्यिकांशी चांगले संबंध होते.