यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील आंबापाणी शिवारातील थोरपाणी येथे घडलेल्या दुदैवी दुर्घटनेत एकच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालेला होता. या दुर्घटनेत परिवारातील एकटा शांतीलाल पावरा हा ८ वर्षीय मुलगा बचावला होता. या मुलाला आधार म्हणून यावल तहसील कार्यालय सरसावले आहे.
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिनांक ३० मे रोजी शांतीलालचा आधार बनत त्याला आज जन्माचा दाखला, त्याचे नाव आजोबांच्या रेशनकार्ड मध्ये समाविष्ट केले, तहसीलदार यांनी स्वतः आधार किट वाल्याला बोलून आधार तयार करून त्याची पावती शांतीलालला दिली. त्याचे डोमिसाईल सर्टिफिकेट त्याला प्रदान केले.
संजय गांधी निराधारचा लाभ मिळण्याचे प्रकरण आजच मनोज खारे (नायब तहसीलदार संजय गांधी निराधार योजना) यांनी स्वतः तयार करून निकाली काढले.
या घटनेतील मयत कुटूंबासाठी मुख्यमंत्री सहायता निधी प्रकरण २८ मे रोजी पुढील कार्यवाहीसाठी महसुल प्रशासनाच्या वतीने पाठवण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागाने शांतीलाल या बालकाच्या पालन पोषण करण्याचे अधिकार आजोबांना दिले आहे. तसे प्रमाणपत्र सुद्धा त्याला देण्यात आले आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी त्याच्यासाठी सोप्या होतील. दाखले व प्रमाणपत्र स्वतः तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिले व त्याला शाळेत जाण्यासाठी आग्रह धरला.
प्रसंगी त्याला डायरी व पेन देऊन त्याला लिखाण करायला लावले, प्रसंगी नायब तहसीलदार संतोष विनंते, मनोज खारे (नायब तहसीलदार सां.गो.यो. ) निवडणूक शाखाप्रमुख रशीद तडवी,तलाठी टी.सी.बारेला थोरपाणी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.