Home Cities जळगाव जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे मिलाद-उल-नबी निमित्त विविध सेवाभावी उपक्रम 

जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे मिलाद-उल-नबी निमित्त विविध सेवाभावी उपक्रम 

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जमात-ए-इस्लामी हिंद, जळगावतर्फे १२ रबी उल अव्वलच्या निमित्ताने शहरात विविध दावती, सामाजिक आणि सुधारणात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा ﷺ यांच्या जीवनचरित्राचा अर्थात सीरते तय्यबाचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच गरजू, वृद्ध आणि रुग्णांची सेवा करण्यावर या उपक्रमांमध्ये भर देण्यात आला.

या उपक्रमांतर्गत २५ ऑगस्ट रोजी वृद्धाश्रमात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अब्दुल समीह साहेब यांनी मराठी भाषेत सीरते पाक ﷺ वर मार्गदर्शन केले. वृद्धाश्रमातील सुमारे ३५ ते ४० ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या गरजा आणि अडचणींची विचारपूस करण्यात आली. यानंतर उपस्थित वृद्धांना फळे तसेच इस्लामिक साहित्याचे वाटप करण्यात आले. १२ रबी उल अव्वलच्या सकाळी जमात-ए-इस्लामी हिंदच्या शिष्टमंडळाने शासकीय जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी सुमारे २०० रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या उपचारादरम्यान मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला आघाडी आणि जीआयओ (GIO) यांच्या संयुक्त विद्यमाने जी.एस. ग्राउंडजवळ ‘मानवी साखळी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून विविध बॅनर्सद्वारे सीरते पैगंबर ﷺ यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. यावेळी नागरिकांना मोफत इस्लामिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.

महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयालाही भेट दिली. रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण आणि गरजू नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. शहरातील मशिदींमध्येही मिलाद-उल-नबी निमित्त विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. मुस्लिम कॉलनी येथील मशिदीत अब्दुल समीह साहेब यांनी सीरते पाक ﷺ वर मार्गदर्शन केले. तसेच नूर मशिदीत स्थानिक अमीर शेख अब्दुल्ला साहेब यांनी पैगंबर हजरत मोहम्मद ﷺ यांच्या जीवनचरित्रातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले

दरम्यान, मेहरूण परिसरातील इक्बाल कॉलनी येथील इक्बाल हॉलमध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. विविध आरोग्य तपासण्यांद्वारे नागरिकांना आपल्या आरोग्याची प्राथमिक माहिती मिळण्यास मदत झाली. मिलाद-उल-नबीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या विविध कार्यक्रमांमधून धार्मिक संदेशासोबतच सामाजिक सेवा, बंधुभाव, मानवता आणि समाजसुधारणेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वृद्धाश्रम, रुग्णालये, मशिदी तसेच सार्वजनिक ठिकाणी राबविण्यात आलेल्या उपक्रमांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.


Protected Content

Play sound