Home Cities रावेर धामोडी सोसायटीत मंदार पाटील यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर ; रावेरच्या राजकारणात...

धामोडी सोसायटीत मंदार पाटील यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर ; रावेरच्या राजकारणात चर्चेला उधाण

0
3


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धामोडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या बैठकीत बाजार समिती संचालक मंदार पाटील यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर झाल्याने रावेर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी स्वतःऐवजी आपले पुतणे मंदार पाटील यांचे नाव सुचवल्याने या निर्णयाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

धामोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या बैठकीकडे तालुक्यातील राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. बैठकीत माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी मंदार पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. उपस्थित सभासदांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिल्याने मंदार पाटील यांच्या नावाचा ठराव संमत झाला. माजी आमदार अरुणदादा पाटील हे भाजपमध्ये असून, मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वतःच्या नावाऐवजी पुतणे मंदार पाटील यांचे नाव पुढे करण्यात आल्याने या निर्णयाकडे आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

मंदार पाटील हे सध्या बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. सहकार क्षेत्रातील या ठरावामुळे त्यांच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील भूमिकेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. धामोडी सोसायटीतील निर्णय हा केवळ संस्थेपुरता मर्यादित नसून, त्याचे तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपकडून रावेर तालुक्यातून कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारीच्या निर्णयावर तालुक्यातील अनेक राजकीय समीकरणे अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मंदार पाटील यांच्या नावाच्या ठरावाला या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बैठकीस माजी आमदार अरुणदादा पाटील, बाजार समिती संचालक मंदार पाटील, चेतन दिलीप पाटील, संजीव नारायण पाटील, बाळू नारायण पाटील, शांतीलाल दशरथ पाटील, योगेश मधुकर पाटील, सचिन रामलाल पाटील, सौ. ताईबाई आत्माराम कोळी, लताबाई वसंत महाजन, सौ. मीराबाई ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. धामोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतील एकमताने मंजूर झालेल्या ठरावामुळे मंदार पाटील यांच्या नावाची चर्चा आता रावेर तालुक्यात अधिक रंगली आहे. आगामी जिल्हा बँक निवडणुकीत भाजपची भूमिका, उमेदवारीचा निर्णय आणि त्यानंतरची राजकीय समीकरणे याकडे तालुक्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound