बीड-वृत्तसेवा | सध्या कारागृहात असणारा वाल्मीक कराड याला धनंजय मुंडे यांचा पीए प्रशांत जोशी यांना देखील संपवायचे होते असा धक्कादायक गौप्यस्फोट आज बाळा बांगर यांनी केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा प्रमुख आरोपी असून तो कारागृहात आहे. कराड याचे एकामागून एक असे अनेक कारनामे समोर आले आहेत. आज पुन्हा यात नव्याने भर पडली. कधी काळी वाल्मीक कराडचा सहकारी असणारा विजयसिंह उर्फ बाळा बांगर याने पत्रकार परिषद घेऊन कराडवर गंभीर आरोप केले. यात कराडने अनेकांचे खून केल्याचा आरोप त्याने केला. तसेच त्याने एक ऑडिओ क्लीप ऐकवून कराड हा एकाला जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचा दावा देखील केला.
दरम्यान, बाळा बांगर याने कराडच्या अमानुष कृत्यांची माहिती देतांना वेगवेगळे गौप्यस्फोट केले. यात धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांनी वाल्मीक कराडचा एकदा कॉल न उचलल्यामुळे तो प्रचंड संतापला होता. लागलीच त्याने जोशी यांचा काटा काढण्याची भाषा केली होती असा गौप्यस्फोट बाळा बांगर याने आजच्या पत्रकार परिषदेत केला. यातून कराडचा मूळ स्वभावा हा प्रचंड खुनशी असल्याचा आरोप देखील त्याने केला.
दरम्यान, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आणि विशेष करून बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे.