पाचोऱ्यात वैशालीताई सुर्यवंशी मारणार बाजी ! : खा. संजय राऊत

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ”पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनता ही निष्ठावंत शिवसेनेसोबत असून आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल तेजाने तळपल्याशिवाय राहणार नाही. वैशालीताई सुर्यवंशी या फक्त आमदारच बनणार नसून त्यांच्यावर अजून मोठी जबाबदारी देखील येऊ शकते !” असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. ते पाचोरा येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजीत मेळाव्यात बोलत होते.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत हे पक्षबांधणीच्या दृष्टीने मेळाव्यांना संबोधित करण्यासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे श्री कैलादेवी मंदिराजवळच्या अटल मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर खा. संजय राऊत यांच्यासह पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख सुनील पाटील, वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, श्रीमती कमलताई पाटील, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, करणदादा पाटील, गजानन मालपुरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, उध्दव मराठे, अभय पाटील, अरूण पाटील, डॉ. अस्मिताताई पाटील, ललीताताई पाटील, योजनाताई पाटील, मनोहरदादा चौधरी, गणेशअण्णा परदेशी, दीपक जिभाऊ पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, रमेश बाफना, तिलोत्तमाताई मौर्य आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

खासदार संजय राऊत यांचे जोरदार जयघोषात आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वतीने खासदार संजय राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. खासदार राऊत यांच्या उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील विविध गावांमधील दोनशे पेक्षा जास्त मान्यवरांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. खासदार राऊत, संजय सावंत व वैशालीताई सुर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या म्हणाल्या की, आजचा मेळावा हा निष्ठावंतांचा आहे, गद्दारांचा नाही ! तात्यासाहेबांनी जनसेवेसाठी शिवसेनेत प्रवेश केला. यातून पक्षाला येथे आमदार मिळाला. त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात आमदारकीच नव्हे तर नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती आदींवरही सत्ता मिळाली. यानंतर पाच वर्षांचा गॅप पडला. नंतर आम्ही दोनदा ज्याला निवडून दिले त्याने बेईमानी केली. आज तात्यासाहेब असते तर त्यांनी ही मुळीच खपवून घेतले नसते. याचमुळे निष्ठा कायम राखण्यासाठी मी राजकारणात सक्रीय झाले. पाचोरा-भडगाव मतदारसंघात कामे झालेली नाहीत. सगळीकडे टक्केवारी, कमीशन, दलाली आदींना उत आलेला आहे. फक्त निवडक कामे करून विकासाचा आभास निर्माण केला जातोय. प्रमुख गावांचे रस्ते, शिवारातील रस्ते आदींची दुर्दशा आहे. अनेक गावांना पिण्याचे पाणी नाही. या मतदारसंघात फक्त तडजोड, भ्रष्टाचार आणि दहशतीचे राजकारण सुरू असून यांना गाडण्याचे काम आपल्याला करायचे असल्याचे वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या.

वैशालीताई पुढे म्हणाल्या की, आता आमदारांना विधानसभा निवडणुकीतला पराभव समोर दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. यामुळे कधीही मतदारसंघात न फिरणारे आता घरोघरी पाया पडू लागले असल्याचा टोला देखील त्यांनी मारला. तर, माझ्या माझ्यमातून उध्दव साहेबांनी महिलेला संधी दिली असून जनता आपल्याला नक्की कौल देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, पाचोऱ्यात आल्यावर सर्वात पहिल्यांदा तात्यासाहेबांची आठवण येते. निष्ठा काय असते याचे प्रतिक म्हणजे तात्यासाहेब होते ! याच पाचोऱ्यात तात्यासाहेबांनी घडविलेल्या आमदाराने गद्दारी केली, त्यांनी कलंक लावला. हा कलंक आपल्याला पुसून काढायचा आहे. या राज्यातील महिला, लेकी, सुना सुरक्षित नाहीत. अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत. आणि यावर मुख्यमंत्री व पंतप्रधान एक शब्दाने बोलण्यास तयार नाहीत. आपल्या मतदारसंघातील गोंडगाव येथील मुलीच्या अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅकवर चालविण्याची घोषणा करून देखील तसे झाले नाही.

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, सरकारला आता लाडक्या बहिणीनंतर, लाडका शेतकरी, लाडका भाऊ, लाडका गद्दार अशा योजना काढाव्या लागतील. मात्र कितीही घोषणा केल्या तरी जनता ही त्यांना मतदान करणार नाही. त्यांनी खरं तर लाडका गद्दार अशी योजना आणण्यास हरकत नसल्याचा टोला त्यांनी मारला. दोन गुजराथी व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राचे नुकसान केले. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना तोडली, त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. शिंदे यांचे शंभर बाप आले तरी शिवसेना त्यांना तोडता येणार नसल्याचे राऊत म्हणाले.

खा. संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला नासवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आता ही बदलण्याची वेळ आली असून लोकसभेतून हा बदल दिसून आला आहे. आम्हाला मतदारांवर विश्वास आहे. करण पवारांनी उत्तम लढत दिली. आमचा पराभव झाला असला तरी भाजपला जमीनीवर आणले. आता निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी त्या कधी तरी घ्याव्याच लागणार आहेत. आणि या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवणार आहे. तर, पाचोरा-भडगावातील जनता ही वैशालीताई सुर्यवंशी यांना आमदार म्हणून निवडून देणार असल्याचा विश्वास व्यक्त करतांनाच त्यांच्यावर मोठी जबाबदारी देखील येऊ शकते याचे सूतोवाच खासदार संजय राऊत यांनी याप्रसंगी केले. याला उपस्थितांनी टाळ्यांच्या जोरदार गजरात दाद दिली. या कार्यक्रमाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

खरी शिवसेना फोडुन ४० गद्दार केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पडुन गेले. हे चित्र संपुर्ण महाराष्ट्रासह संबंध देशाने अनुभवलेले आहे. मात्र या गद्दारांचे राजकीय भवितव्य आत्ता संपुष्टात येणार असुन महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडुन येतील असा मला विश्वास आहे. असे प्रतिपादन संजय राऊत यांनी पाचोरा येथील भडगाव रोड वरील कैला माता मंदिराजवळ आयोजित मेळाव्यात केले. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांचे भाषण संपल्यानंतर संजय राऊत मनोगत व्यक्त करण्यासाठी येत असतानाच मेळाव्यात उपस्थितांनी कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा दिल्या. त्यावर संजय राऊत म्हणाले की, मी आलो आहे मात्र इथल्या गद्दाराला गाडयायला. असे म्हणताच उपस्थितां मधुन एकच जल्लोष झाला. या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, वैशाली सुर्यवंशी, विष्णु भंगाळे, करण पवार, डॉ. अस्मिता पाटील, अरुण पाटील, रमेश बाफना, अॅड. अभय पाटील यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

सन – २०२४ मध्ये होवु घातलेल्या विधानसभेचे वारे वाहु लागल्याने विविध पक्षांचे मेळावे आता सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून २२ रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा मेळावा पाचोऱ्यात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात संजय राऊत यांनी आपल्या शैलीत पुढे बोलतांना सांगितले की, राज्य सरकारला आपला पराभव जवळ दिसत असल्याने निवडणुका पुढे ढकलत आहेत. अनेक योजनांचा वर्षात करत आहेत मात्र १५०० रुपयांची भिक न देता माता भगिनींना संरक्षण द्या अशी परखड टीका संजय राऊत यांनी केली. मुख्यमंत्री व त्यांच्या सोबत असलेल्या गद्दार हे महाराष्ट्र लुटायला निघाले आहेत त्यांना दोन गुजराथी व्यापाऱ्यांचे पाठबळ आहे. मात्र आम्ही तसे होवु देणार नाही. असेही संजय राऊत यांनी सांगितले.

.वैशाली सुर्यवंशी यांनी आ. किशोर पाटीलांवर निषाणा साधत सांगितले की, मेळाव्यात उपस्थित जनसमुदाय बघता अनेकांच्या पाया खालील जमिन घसरु लागली आहे. स्व. आर. ओ. तात्या पाटील जीवंत असते तर त्यांनी कधीच पक्षाशी गद्दारी केली नसती‌. मी त्यांची कन्या आहे व त्यांची वारसदार या नात्याने मी निवडणुकाला उभी राहणार असुन राजकारण माझा धंदा नसुन ध्येय मुक्त, भ्रष्टाचार मुक्त, टक्केवारी मुक्त अजेंडा घेवुन मी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. यापुढे आ. किशोर पाटील यांनी माझे वडिल स्व. आर. ओ‌. तात्यांचा फोटा वापरण्याचा त्यांना काहीच अधिकार नसुन माझ्या वडिलांचा फोटो कुठल्याही बॅनर वर वापरु नये असेही वैशाली सुर्यवंशी यांनी भर सभेत सांगितले. निष्ठावंत शिवसैनिक हे माझ्या बाजुने आहेत त्यामुळे सत्य परेशान होता है पर पराजीत नही‌. मला मतदार संघातुन भरभरुन प्रतिसाद मिळत असल्याने माझा आत्मविश्वास अधिका अधिक वाढत आहे. या मेळाव्याचे सुत्रसंचलन नाना वाघ यांनी केले तर उपस्थितांचे शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख आभार अरुण पाटील यांनी मानले. मेळाव्याची सांगता राष्ट्रगीत गावुन करण्यात आली.

संजय राऊत यांचे सकाळी १० वाजता शहरातील भारत डेअरी येथे आगमन झाले. या ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने मोटरसायकलवर शिवसेनेचा भगवा झेंडा लावत फटाक्यांची आतषबाजी करून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करत सदरची मोटरसायकल रॅली कृष्णापुरी, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे भुयारी मार्ग, राजे संभाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक ते मेळाव्या ठिकाणी आणण्यात आली.

Protected Content