वैशाली सुर्यवंशी यांना खंडणीसाठी धमकी; गुन्हा दाखल


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील भाजपा नेत्या वैशाली सुर्यवंशी यांना अज्ञात इसमाने भ्रमणध्वनीद्वारे धमकावून तब्बल ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सुर्यवंशी यांनी तात्काळ पाचोरा पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वैशाली सुर्यवंशी या भाजपच्या उमेदवार होत्या. निवडणुकीनंतर एका अज्ञात क्रमांकावरून त्यांना फोन आला होता. त्या व्यक्तीने राजकीय सौदेबाजीसंदर्भात बोलत “तुम्हाला मी जिंकवून देतो” असे सांगितले होते. परंतु वैशाली सुर्यवंशी यांनी या कॉलकडे दुर्लक्ष केले. मात्र यानंतर या इसमाने सप्टेंबर २०२५ मध्ये पुन्हा एकदा विविध मोबाईल नंबरवरून संपर्क साधत धमकी दिली.

या अज्ञात व्यक्तीने आक्षेपार्ह भाषेचा वापर करत, “तुम्ही निवडणुकीत पैसे वाटले” असा बनावट व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करेल, असे म्हणत दबाव टाकला. तसेच इनकम टॅक्स, सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांकडे तक्रार करेल अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, “तुमच्या गाडीमध्ये ड्रग्स ठेवून बदनामी करेल, तुमचं कुटुंब समाजात डागाळेल” अशा पद्धतीने मानसिक छळ सुरू केला.

या सर्व प्रकारांमुळे व्यथित झालेल्या वैशाली सुर्यवंशी यांनी अखेर पाचोरा पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध भादंवि कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

घटनेमुळे पाचोरा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.