फैजपूर प्रतिनिधी । ऊस उत्पादकांचे थकित रक्कम देण्यासाठी गुरुवारी शिवसेनेतर्फे मधुकर सहकारी साखर कारखान्यात चेअरमन शरद महाजन तसेच प्रांताधिकारी अजित थोरबोले यांना निवेदन देण्यात आले. ऊस उत्पादकांचे पेमेंट त्वरित मिळावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा शिवसेना प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात मधुकर सहकारी साखर कारखानाने ऊस उत्पादकांना पहिला हप्ता 1 हजार 600 प्रमाणे दिलेला आहे. मात्र दुसरा हप्ता 321 रुपये तसेच फेब्रुवारीपासूनचे पूर्ण थकित रक्कम कारखान्याकडे बाकी आहे. सध्या शेतकरी दुष्काळाला सामोरे जात असताना अनेक अडचणींचा सामाना करवा लागत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावे यासाठी चेअरमन शरद महाजन यांना आग्रह धरण्यात आला. यावेळी महाजन यांनी कारखाना एनपीएमध्ये असल्याने जिल्हा बँकेकडून पैसे उपलब्ध होण्यास अडचण येत आहे. शासनाने हमी दिल्यास ऊस उत्पादकांना लगेच पैसे देण्यात येतील, असे सांगितले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदरचा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत देण्यात येईल व मधुकरला शासनाची थमी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही दिला. आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व थकीत पेमेंट मिळविण्यासाठी कारखान्यासमोर आंदोलनही करण्यात येतील असेही सांगितले. यावेळी जिल्हा संघटक दीपक बेहेडे, जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, यावल तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, उपतालुकाप्रमुख राजू काठोके, नगरसेवक अमोल निंबाळे, विलास चौधरी, शरद कोळी, रजनी चौधरी, संजय तेली यांच्यासह असंख्य शिवसैनिक व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.