जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी उर्दू शाळेतील दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नसल्याने २ जुन पासून शाळा सोडल्याचा दाखला मिळत नसल्याने संतप्त पालकांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जावून घेराव घालून निवेदन दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे के.एस.टी. उर्दू शाळा आहे. या शाळेत मुख्याध्यापकांची अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान, गेल्या महिन्यात दहावीचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांना पुढील शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे. परंतू २ जून पासून शाळेत मुख्याध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर दाखला मिळत नाही. शिक्षण संस्थेच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. यासंदर्भात मन्यार बीरादरीचे अध्यक्ष फारूख शेख यांच्या नेतृत्वा पालकांचे शिष्टमंडळ यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन घेराव घातला. यावेळी उपशिक्षणाधिकारी रागिनी पाटील यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. दरम्यान १० जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना दाखले न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी उर्दू शाळेच्या प्रशासकपदी शिक्षण विस्तार अधिकारी शेख खलील यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांना दाखले मिळणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी रागिनी पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारूख शेख, सय्यद वासिफ अली निसार अली, मोहम्मद रइस सय्यद महबूब, शेख मुजम्मिल हारून, शेख मुजाहिद रज्जाक, फझल अब्दुल रज्जाक, सादिक शेख सुपडू आदींची उपस्थिती होती.