रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना यांसारख्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार हे अनुदान डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे जमा होणार असल्याने आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाइल नंबर अद्ययावत असणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात अनुदानासाठी कागदपत्रे सादर करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी विशेष सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित गावातील तलाठी आणि कोतवाल यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांची नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण करावी.
तहसीलदारांच्या सूचनेनुसार सर्व संबंधित लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाइल नंबर आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत अद्ययावत करून घ्यावीत. आवश्यक असल्यास, संबंधित तहसील कार्यालयात जाऊन मार्गदर्शन घेतले जावे.
आमदार जावळे यांनी सांगितले की, “लाभार्थ्यांनी बँक खात्यांमध्ये अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे अद्ययावत करणे गरजेचे आहे. तसेच गावांतील केंद्रांवर देखील आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”