जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीचा तडाखा बसला आहे. शनिवारी रावेर तालुक्यात झालेल्या गारपिटीनंतर आज रविवारी दुपारी चोपडा तालुक्यातील अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह गारपिटी झाली आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जिल्ह्यात अवकाळी गारपिटीचे संकट कायम असल्याने बळीराजाची चिंता अधिक वाढली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
राज्यात दोन आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले होते. त्यानंतर तापमानात वाढ झाली असली तरी, हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी जिल्ह्यात कडक उन्हाचे चटके जाणवत असताना, दुपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा, मितावली या शिवारात सुमारे पाच मिनिटे जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतातील रब्बी हंगामातील गहू, कांदा, केळी, मका आणि इतर पिकांसह फळपिकांना मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीच्या वेळी आलेल्या या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
यापूर्वी शनिवारी रावेर तालुक्यात झालेल्या गारपिटीने मोठे नुकसान केले होते. तालुक्यातील १९ गावांमधील तब्बल ७३३ शेतकऱ्यांचे सुमारे ५०९ हेक्टरवरील केळीचे पीक या गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाले आहे. यात रावेर शहर आणि परिसरातील ३०० हेक्टरवरील केळी पिकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नुकसान झालेल्या केळीमध्ये ऐन कापणीवर आलेल्या पिकांचा समावेश असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा मोठे आव्हान उभे राहिले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली असून, त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.