जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोर राष्ट्रीय महामार्गावर समोरासमोर दोन दुचाकीच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावरून भरधाव अज्ञात वाहन गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. यात सोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
दिपक सुरेश नन्नवरे (वय-२०) रा. बांभोरी ता. धरणगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिपक सुरेश नन्नवरे हा आईवडील आणि भावांसोबत धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी सांयकाळी दिपक नन्नवरे हा गावातील खासगी काम आटोपून त्याचा मित्र ललित गोकूळ पाटील रा. बांभोरी याच्यासोबत जळगावाकडून बांभोरी येथे दुचाकीने येत होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरून राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या धडकेत दिपक नन्नवरे हो महामार्गावरील रस्त्यावर मध्यभागी पडला. त्याचवेळी बांभोरीगावाकडून जळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिपक नन्नवरे याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला ललित पाटील हा गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर बांभोरी गावातील ग्रामस्थांनी व मित्र परिवारांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या ललितला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्रपरिवारांची मोठी गर्दी जमली होती. मयताच्या पश्चात आई सरला, वडील सुरेश शामराव नन्नवरे, मोठा भाऊ राकेश आणि लखन असा परिवार आहे.