यावल येथे विद्यापीठस्तरीय “अभ्यासक्रम पुनर्रचना ई-कार्यशाळा’ उत्साहात

यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्षांतर्गत मराठी विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि मराठी अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गांच्या सन 2022-23 पासून बदलणाऱ्या अभ्यासक्रमावर आधारित विद्यापीठ स्तरीय “अभ्यासक्रम पुनर्रचना ई- कार्यशाळा ” आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. आशुतोष पाटील उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कला व ललितकला विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी भूषविले.

प्रारंभी प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्था व महाविद्यालयाची सविस्तर माहिती सादर केली व ई- कार्यशाळेच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. उद्घाटक प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी आपल्या भाषणात बदलणाऱ्या अभ्यासक्रमात बदलत्या काळानुसार कोणकोणते घटक अपेक्षित आहेत ह्या गोष्टींचा उहापोह केला. प्रमुख अतिथी डॉ. आशुतोष पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना असे सांगितले की नवीन अभ्यासक्रम तयार करण्यापूर्वी सीबीसीएस पॅटर्नचा आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतरच पुढील वाटचाल ठरविणे उचित होईल.

अध्यक्षीय भाषणात डॉ. शिरीष पाटील यांनी असे प्रतिपादित केले की, प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात वैचारिक लेखन, विनोदी कथा,गेय कविता, नाटकातील स्वगत  व लघु कादंबरी इत्यादी घटकांचा समावेश करण्यात यावा तसेच अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असावा. प्रथम सत्रात प्रथम वर्ष कला वर्गाच्या वाङ् मयीन व उपयोजित मराठी या विषयावर विचारमंथन करण्यात आले. या सत्रात अध्यक्ष म्हणून शिरपूर येथील एस .पी. डी. एम महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. डॉ. फुला बागुल उपस्थित होते. सदर सत्रात डॉ. संदीप माळी (मुक्ताईनगर), डॉ. अतुल देशमुख (भडगाव), डॉ. वाल्मिक आढावे (म्हसदी), डॉ. प्रशांत लगडे (धुळे), डॉ. मधुचंद्र भुसारे (चोपडा) यांनी आपल्या मौलिक सूचना सादर करून आपला विशेष सहभाग नोंदविला. अध्यक्षीय भाषणात डॉ. फुला बागुल यांनी अभ्यासक्रमात खानदेशी साहित्याचा समावेश करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

द्वितीय सत्राचे अध्यक्षस्थान भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे डॉ.जे.एफ. पाटील यांनी भूषविले. या सत्रात प्रथम वर्ष वाणिज्य व प्रथम वर्ष विज्ञान वर्गांच्या अभ्यासक्रमावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. याप्रसंगी डॉ. अक्षय घोरपडे (जामनेर), डॉ. दीपक सूर्यवंशी (फैजपूर ), डॉ. वंदना लव्हाळे ( मुक्ताईनगर), डॉ. महेंद्र सोनवणे (ऐनपूर), डॉ. सुधाकर चौधरी (शिरपूर ),डॉ. माणिक बागले (पारोळा )यांनी अभ्यासक्रमाबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. अध्यक्ष प्रा. डॉ.जे.एफ. पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना असे सांगितले की अभ्यासक्रम जीवन मूल्ये विकसित करणारा व उत्तम भावी नागरिक घडवणारा असावा.

समापन सत्राचे अध्यक्ष म्हणून पाचोरा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. रत्ना जवरास (बोदवड) व डॉ. संजय  खैरनार (नगाव) यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून महाविद्यालयाच्या उत्कृष्ट संयोजनाचे कौतुक देखील केले. प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यशाळेतील संपूर्ण विचारमंथनावर  आपले विचार व्यक्त केले व अभ्यासक्रमाबाबत आपल्या अपेक्षा देखील व्यक्त केल्या. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एस.आर.गायकवाड यांनी आभार व्यक्त केले तर संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन कार्यशाळेच्या संयोजिका व मराठी विभाग प्रमुख डॉ. सुधा खराटे यांनी केले. सदर कार्यशाळेत 105 प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदवला.

ई-कार्यशाळा  यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा. मनोज खैरनार, संजय पाटील, सुभाष कामडी, तांत्रिक सहाय्यक डॉ. गिरीश कोळी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू -भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

 

Protected Content