‘देशाच्या विकासासाठी चांगल्या शिक्षकांची आवश्यकता’ – प्रा.डॉ.जितेंद्र नाईक

जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।चांगले शिक्षक निर्माण झाले तर चांगले विद्यार्थी निर्माण होतात आणि चांगले विद्यार्थी निर्माण झाले तर चांगला समाज, देश निर्माण होतो. देशाच्या विकासासाठी चांगल्या शिक्षकांची आवश्यकता असते. त्यामुळे चांगले शिक्षक निर्माण होण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात.” असे प्रतिपादन विद्यापीठातील ‘यु.आय.सी.टी.’चे संचालक तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ.जितेंद्र नाईक यांनी केले. ते राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी बोलत होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दि. 16 व 17 मार्च, 2022 रोजी नेट, सेट आणि पेट परीक्षेच्या पहिल्या पेपर करिता राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचा समारोप शुक्रवार, दि. 17 मार्च रोजी दुपारी 4.00 वाजता प्रा.डॉ.जितेंद्र नाईक यांचा प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. अनिल चिकाटे, कार्यशाळेचे मुख्यसंयोजक विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर, कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रा.डॉ. कमलाकर पायस (अमरावती) प्रा.डॉ राजेश बोबडे (वरूड, जि.अमरावती), प्रा.पल्लवी इंगोले (धारणी, जि.अमरावती),प्रा.डॉ. रविंद्र पाटील (तिवसा, जि.अमरावती) उपस्थित होते.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.जितेंद्र नाईक पुढे म्हणाले, “कोणत्याही राष्ट्रासाठी संशोधन हे महत्वाचे असते. बहुतांशी संशोधन हे शिक्षकच करतात. त्यामुळे तुम्ही शिक्षक झाला तर संशोधन कार्यात सहभागी व्हा आणि विद्यार्थी घडविण्यासोबतच संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्या असा महत्वपूर्ण सल्ला ही त्यांनी यावेळी विद्यार्थाना दिला.”

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ अनिल चिकाटे म्हणाले, “सेट, नेट व पेट परीक्षेची तयारी करताना विद्यार्थांनी विविध संदर्भग्रंथाचा आवर्जून अभ्यास करावा. आज अनेक विषयाचे संदर्भग्रंथ ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यांची हाताळणी करणे देखील सहज सोपे आहे. त्यामुळे या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विविध संदर्भग्रंथ आणि अशा विशेष मार्गदर्शन वर्गाचा माध्यमातून तयारी करावी.” असे त्यांनी यावेळी सांगितले.

समारोप सत्राचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी केले. त्यांनी कार्यशाळेचा आढावा मांडून दोन दिवसातील चार सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना नेट, सेट आणि पेट संदर्भात दिलेल्या मौलिक मार्गदर्शनाचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ वडनेरे तर आभार डॉ. विनोद निताळे यांनी मानले.

कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी (दि. 17 मार्च) प्रथम मार्गदर्शन सत्रात प्रा.पल्लवी इंगोले (वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणी, जि.अमरावती) यांनी उच्च्य व तंत्रशिक्षण, भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण याविषयावर तर दुपारच्या सत्रात प्रा.डॉ. रविंद्र पाटील (या. द. व. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तिवसा, जि.अमरावती) यांनी संवाद कौशल्य, माहिती तंत्रज्ञान आणि डेटा विश्लेषण याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी सहभागी विद्यार्थांनी नेट सेट व पेट या संबंधी विविध प्रश्न चॅटबॉक्सच्या माध्यमातून विचारून शिक्षकांशी संवाद साधला. दोन्ही मार्गदर्शन सत्राचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ गोपी सोरडे यांनी केले. या कार्यशाळेत महाराष्ट्रातून 850 पेक्षा अधिक विद्यार्थी विभागाच्या युट्यूब चॅनल द्वारे सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी विभागातील कर्मचारी रंजना चौधरी, प्रल्हाद लोहार, कुंदन ठाकूर, प्रकाश सपकाळे व विष्णू कोळी यांनी सहकार्य केले.

Protected Content