
भुसावळ, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात “एकता रॅली”चे भव्य आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारी ही रॅली गांधी पुतळ्यापासून दुपारी ४ वाजता प्रारंभ झाली आणि जळगाव रोडवरील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.
या रॅलीला केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. रॅलीनंतर तिन्ही मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी देशातील एकतेचा आणि अखंडतेचा संदेश देणारे घोषवाक्ये दिली जात होती.
या एकता रॅलीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस (पूर्व विभाग) केतकी पाटील, उद्योजक मनोज बियाणी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्यासह शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
या उपक्रमाद्वारे भुसावळकरांनी राष्ट्रीय एकतेचा, बंधुतेचा आणि समाजातील सलोख्याचा संदेश दिला. सरदार पटेल यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प नागरिकांनी केला.



