जळगाव (प्रतिनिधी) आज मराठी भाषा दिन ! जगभरातील मराठी माणसे दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा करतात. महान मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस “मराठी भाषा दिन” म्हणून साजरा केला जातो. आज आपण आपल्या ओळखीत कोणालाही विचारले की, तुमचा पाल्य कोणत्या माध्यमात शाळेत शिकत आहे ? तर बहुतांशी जणांचे उत्तर एकच येईल आणि ते उत्तर म्हणजे इंग्रजी मध्यम.
पण ही परिस्थिती बदलण्यासाठी जळगावातील एक शाळा पुढे आलेली आपल्याला दिसते. १९८८ साली प्रबोधन संस्थेतर्फे जळगांव येथे या शाळेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रात समाजोपयोगी कार्ये लोकसहभागातून केली जातात. प्रबोधन संस्थेने १९९९ पासून खोटेनगर, निमखेडी परिसरातील गरीब, मध्यमवर्गीय कुटूबांतील मूलांना उत्कृष्ट, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सुरक्षानगरजवळ (खोटेनगर) भाड्याच्या इमारतीमध्ये मातोश्री प्राथमिक विद्यालयाची स्थापना केली. आज या शाळेत गरिब व होतकरू अशा जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांना उपरोक्त साहित्य पुरविले जात आहे.
बिकट परिस्थितीत सुरु झालेल्या या शाळेत आज प्रशस्त वातानुकूलित वर्गखोल्या, सी.सी.टी.व्ही.कॅमेरे, व्हाईट बोर्ड, एल.सी.डी.प्रोजेक्टर्स, अग्निशमन यंत्रे, स्वतंत्र दोन संगणक कक्ष, पिण्यासाठी आर.ओ.चे शुध्द पाणी, ईन्व्हर्टर सुविधा, संपूर्ण इमारतीस रंगरंगोटी, विद्यार्थ्यांसाठी पुरेशी प्रसाधन गृहे, पाणी उपलब्धतेसाठी कुपननलिका, विद्यार्थ्यांना दैनंदिन परिपाठ, तसेच वार्षिक स्नेहसंमेलनासाठी पक्क्या स्वरुपाचे व्यासपीठ, संगीतमय परिपाठासाठी साऊंड सिस्टिम सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर आजुबाजूच्या गावांतील शेतकरी, मजूर यांच्या मूलांनाही शिक्षण घेता यावे, म्हणून नविन स्कूल बस सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिलेली आहे.
आज आधुनिक काळात राज्यातील मराठी शाळा पटसंख्येअभावी तसेच सरकारी अनास्थेमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या इंग्रजी शाळांची भरमसाठ फी भरतांना मध्येमवर्गीय पालकांना बरीच कसरत करावी लागत आहे. गरीबांची मूले या शाळांतील भरमसाठ फी मुळे प्रवेश घेऊ शकत नाहीत. अशा या सर्व परिस्थितींचा विचार करून संस्थेने आपली शाळा ‘वातानुकुलीत मराठी शाळा’ म्हणून नावारूपाला आणलेली आहे. याचबरोबर शाळेतील अनुभवी शिक्षक वर्गही संस्थाध्यक्षांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच संस्कार घडविण्याचे कार्य करीत आहे. विविध महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या जीवनकार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जात आहे. अशा उपक्रमाबरोबरच विविध सहली, क्षेत्रभेटी, बागकाम, निसर्गभेट, बँकिग ज्ञान याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण म्हणजेच बौध्दिक, शारिरीक व मानसीक विकास साधण्यासाठी संस्था व शाळा धडपडत आहे. कारण संस्थेचे ब्रीदवाक्यच आहे ‘शिक्षणच नव्हे , संस्कार!’ माय मराठीच्या संवर्धनासाठी या शाळेसारख्या अनेक शाळा तयार होणे आज काळाची गरज आहे.