केंद्रीय मंत्री मांडवीय व मंत्री खडसेंनी एसपी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवण्याचा संकल्प केला आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी सुयोग्य नियोजनाची आवश्यकता असून विकसित भारताच्या निर्मितीत तरुणांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कामगार, रोजगार तथा युवा कार्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले.

पुण्यातील एसपी महाविद्यालय येथे ‘विकसित भारत अॅम्बेसेडर – युवा कनेक्ट’ उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय युवा कार्य राज्यमंत्री रक्षा खडसे, ऑलिम्पिक 2024 मधील कांस्यपदक विजेता स्वप्निल कुसाळे, केंद्रीय युवा कार्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव नितीश मिश्रा, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एस. के. जैन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘विकसित भारत अॅम्बेसेडर – युवा कनेक्ट’ उपक्रमाची महाराष्ट्रात सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासंदर्भात तरुणांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक पेड माँ के नाम उपक्रमाअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले की एसपी महाविद्यालयाचा इतिहास पाहता अनेक सामर्थ्यवान विद्यार्थी येथून घडले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात देशाची सेवा केली. आपण पाहिलेले विकसित भारताचे स्वप्नही अशाच सामर्थ्यवान विद्यार्थ्यांच्या बळावर पूर्ण होणार आहे. मात्र यासाठी सुयोग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे.”

याबाबत अधिक विस्ताराने मार्गदर्शन करताना डॉ. मांडवीय म्हणाले की पूर्वीच्या सरकारांनी केवळ गरिबी हटाव ची घोषणा दिली होती. ती घोषणा केवळ घोषणा बनूनच राहिली. त्याचप्रमाणे एकविसाव्या शतकातील भारताचेही स्वप्न आपल्याला दाखवण्यात आले होते. पण नियोजनाच्या अभावामुळे हे लक्ष्य आपण गाठू शकलो नाही. या बाबी विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चोखपणे विकसित भारतासाठीचे नियोजन केले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात युवाकेंद्रीत निर्णय घेण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी, केंद्रीय युवा कार्य राज्यमंत्री रक्षा खडसे सर्व विद्यार्थ्यांना विकसित भारतात वाटा उचलण्यासाठी My Bharat पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून My Bharat पोर्टलच्या माध्यमातून त्यांना देशसेवेची मोठी संधी आहे. प्रत्येक विद्यार्थी लहान-लहान गोष्टींच्या माध्यमातून आपला देश विकसित बनवण्याचे मोठे कार्य पार पाडू शकतो, असा विश्वास यावेळी रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्निल कुसाळे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून आपला पदक विजयाचा प्रवास सर्वांना सांगितला. केंद्रीय युवा कार्य मंत्रालयाच्या अनेक योजना या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, याचा सर्व खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वप्निल कुसाळे यांनी केले.

 

Protected Content