दुदैवी घटना : पाण्याच्या टाकीत पडल्याने चिमुरडीचा बुडून मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातील उस्मानिया पार्कमध्ये लग्नासाठी आलेल्या बालिकेचा मंडपाजवळील बांधकामाच्या ठिकाणी अंडरग्राउंड पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.

जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात ९ डिसेंबरला राज्य परिवहन मंडळाचे निवृत्त कर्मचारी मुक्तार सय्यद यांच्या मुलीचे लग्न होते. लग्नासाठी नातेवाईक आले होते. वऱ्हाड्यांमध्ये निजामपूर ता. साक्री येथील परवेझ सय्यद यांची पत्नी तीन मुलांसह शुक्रवारपासून जळगावला आल्या होत्या. उस्मानिया पार्क परिसरात ड्युप्लेक्स स्किम अंतर्गत मागूनपुढून आठ घरांचे बांधकाम सुरू आहे. लग्न मंडपाला लागूनच बांधकाम सुरू असल्याने लग्नासाठी आलेल्या लहान मुलांसह गल्लीतील मुलेही येथे खेळत होती. खेळता-खेळता तस्मिरा परवेझ सय्यद या दीड वर्षीय बालिकेचा पाण्याने भरलेल्या १० ते १२ फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू झाला.

काही वेळाने सर्वच लहान मुले बांधकामाच्य ठिकाणी, वाळूवर खेळत असल्याचे सय्यद यांच्या लक्षात आले. स्लॅबचे काम सुरू असल्याने त्यांनी लहानग्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांना भरलेला सेप्टीटँक दिसला. त्यांनी एकेक करून चारही घरातील टँक पाट्यांनी झाकण्यास सुरवात केली. चौथ्या टँकमध्ये मुलीचा फ्रॉक दिसल्याने कुणाची बाहुली टाकीत पडली म्हणून डोकावले असता त्यात मृत बालिका आढळली. पाण्याच्या टाकीत बालिका पडल्याचे कळताच लग्नमंडपात महिलांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, मुलीला रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली.

बालिकेचे वडील परवेझ सय्यद साक्री तालुक्यात रिक्षा चालवून गुजराण करतात. जवळचे लग्न असल्याने पत्नी तिन्ही चिमुरड्यांसह कुटुंबातील इतर लोक जळगावला आले होते. तस्मिराचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलीची आई बेशुद्ध पडली. आईच्या अक्रोशने मंडपात आणि संपूर्ण गल्लीत महिलांना हुंदके अनावर झाले होते.

Protected Content