विद्युत पोलवर शॉक लागून वायरमनाचा दुर्दैवी मृत्यू

 

पारोळा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पारोळा येथील महावितरण मध्ये गेल्या ६ वर्षापासून कंत्राटी वायरमन म्हणून सेवा बजावणाऱ्या तरूण वायरमनाचा विद्युत पोलवर शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

पारोळा शहरातील स्वामीनारायण नगर येथील रहिवासी दिनेश शामकांत भामरे (वय -३२) हा पारोळा महावितरण मध्ये गेल्या ६ वर्षापासून कंत्राटी वायरमन म्हणून कामकाज पाहत होता. शनिवारी ६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दिनेश भामरे हा म्हसवे गावाच्या पुढे नगाव रोडालगत एका इलेक्ट्रिक पोलवर काम करीत असतांना चिपकून लटकलेल्या अवस्थेत होता. सदर घटनेची माहिती पसरताच नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यास पोल वरून खाली उतरवून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले.तेथे डॉक्टरांनी त्यास रात्री दहा वाजता तपासून मयत घोषित केले.याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान शामकांत भामरे यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून कुटुंबाचा कर्ता मुलगा दिनेश भामरे याचे असे अचानकपणे जाणे ही बाब मोठी दुःखद आहे. त्यामुळे वीज वितरणच्या माध्यमातून मोठी मदत मिळावी अशी अपेक्षा भामरे कुटुंबीयांसह पारोळा शहरवासीयांनी केली आहे.
दरम्यान यावेळी शहरवासीयांनी महावितरणच्या कार्यालयावर एकच मागणी करत कुटुंबास
जोपर्यंत मदतीचा हात पुढे होत नाही तोवर दिनेश भामरे वर अंत्यसंस्कार होणार नाहीत अशी भूमिका घेतली.या वेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत मध्यस्थी केली.अखेर भामरे कुटुंबाला आश्वासित केल्या नंतर ७ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दिनेश भामरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्या पश्चात आई,वडील,पत्नी, बहिण,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.

मयत दिनेश हा मनमिळावू स्वभावाचा व प्रत्येकाच्या हाकेला धावणारा होता.त्यामुळे त्याचा मित्र परिवाराचा मोठा गोतावळा होता.त्याचा अकस्मात मृत्यु झाल्याने त्यास बघण्यासाठी गावकऱ्यांसह मित्र परिवाराने कुटीर रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

Protected Content