जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील तरूण हा धावत्या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता भादली रेल्वे स्टेशन जवळ उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अविनाश सुरेश देवरे वय २७ रा. नशिराबाद ता.जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश देवरे हा तरूण आपल्या आईवडील, भाऊ आणि बहिण यांच्या सोबत जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात वास्तव्याला होता. जळगाव एमआयडीसीतील सिध्दार्थ केमीकल कंपनीत तो कामाला होता. नेहमीप्रमाणे शनिवारी २४ ऑगस्ट रोजी अविनाश देवरे हा कामाला निघून गेला. त्यानंतर भादली रेल्वेस्टेशन जवळ रेल्वे रूळ ओलांडत असतांना तो धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. अविनाश हा घरात मोठा असल्याने कमवता होता. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई प्रमिलाबाई., वडील सुरेश देवरे, लहान भाऊ अनिल आणि लहान बहिण असा परिवार आहे.