एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत असलेल्या 17 शासकीय व 32 अनुदानित आश्रम शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव महोदय, आयुक्त, अप्पर आयुक्त यांच्या निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज १५ जून रोजी शाळा प्रवेशोत्सवानिमित्त शाळांवर प्रभात फेरी आयोजन, विद्यार्थ्यांचे औक्षण तथा पुष्पगुच्छ देऊन स्वागत, शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप, गणवेष तथा शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सवानिमित्त प्रत्येक शाळेवर पालक मेळावा घेण्यात आला व त्यामध्ये शैक्षणिक वर्षात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा तथा उपक्रमांचा आढावा तसेच माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी, गावातील लोक प्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सदस्य आदी उपस्थित होते. प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, पालक वर्ग व सर्व विद्यार्थी यांचेसाठी मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी नवीन शैक्षणिक वर्षात गुणवत्तेवर भर देण्यात येणार असल्याचे सांगुन आगामी शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. या प्रवेशोत्सवासाठी प्रकल्प अधिकारी अरुण पवार तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील व शराजेंद्र लवणे यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी यावल प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी , शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Protected Content