जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलावर तरूणाच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने तरूणासह त्याचा काका जखमी झाल्याची घटना सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री घडली. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून शहर पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ईस्माईल हुसेन गवली (वय-२३) रा. शनीपेठ पोलीस स्टेशन समोर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २१ ऑगस्ट रोजी ईस्माईल हा त्याचा काका शेख खालील शेख रशिद यांच्यासोबत गेंदालाल मिल येथे दुचाकी (एमएच १९ सीक्यू ००३६)ने गेला होता. रात्री ९ वाजून ४० मिनीटांनी काम आटोपून दुचाकीने परत येत असतांना छत्रपती शिवाजी रेल्वे उड्डाणपुलावरून जात असतांना समोरून कारला ओव्हरटेक करत भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी (एमएच १९ डीव्ही १८९७) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ईस्माईल व त्याचे काका शेख खालील हे जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दुचाकीवरील चालक सद्दाम शाह युसूफ शाह रा. गेंदालाल मिल, जळगाव याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.