विजेच्या मागणीत वाढ,

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढता आहे. गेल्या चार पाच दिवसाचे तापमान ४३ ते ४४ अंशाच्या दरम्यान आहे. वाढत्या तापमानामुळे शहरी भागात पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला आहे. तर ग्रामीण भागात उन्हाळी व बागायती पिकांना पाणीपुरवठ्यासाठी विजेची मागणी वाढली आहे. वीज वितरण प्रणाली, यंत्रणावर ताण पडल्याने डीपी जळण्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

जिल्हयात दरवर्षा पेक्षा यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता जास्त प्रमाणात जाणवून येत आहे. जिल्ह्यातच नव्हेतर राज्यात वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी वाढली आहे. सध्यस्थितीत राज्यात २४५०० मेगावॉट विजेची मागणी आहे. दोन दिवसापासून शहरात तसेच ग्रामीण भागात वारंवार वीज जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे घरगुतीच नव्हेतर रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयातील उपकरणासाठी विजेची मागणी वाढली आहे.दुसरीकडे वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा पुरवठ्यात घट झाली आहे, त्यामुळे वीजनिर्मितीवर पर्यायाने महावितरणच्या कार्यप्रणालीवर देखील परिमाण होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात पूर्व भागात केळी उत्पादनासह अन्य उन्हाळी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणत आहे. ग्रामीण भागात कृषी क्षेत्रात वीजपुरवठा वेळापत्रक देखील अंमलबजावणी केली जात असली तरी, वाढत्या तापमानात शेतकरी रात्रीचा दिवस करीत पिके जगवण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे विजेची मागणी वाढल्यामुळे जळगाव शहरासह ग्रामीण भागात दोन दिवसात बऱ्याच ठिकाणी वारंवार वीजपुरवठा देखील खंडित होत असल्याचे दिसून आले आहे.

Protected Content