


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सामाजिक आणि धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर राहून ग्रामस्थांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे कोथळी येथील माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उमेश सुभाष राणे (वय ४०) यांचे सोमवारी, ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता समजताच कोथळी गावासह परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
उमेश राणे हे ग्रामपंचायतीतील अनुभवी मार्गदर्शक आणि सहकारी म्हणून परिचित होते. ग्रामविकासाच्या विविध कामांमध्ये तसेच ग्रामस्थांशी संबंधित उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. माजी उपसरपंच म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात योगदान दिले होते. सध्या ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते. सामाजिक कार्यासोबतच धार्मिक उपक्रमांमध्येही उमेश राणे यांचा विशेष सहभाग होता. मुक्ताई पालखी आगमन सोहळा समितीचे सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. आई मुक्ताईच्या विविध धार्मिक आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये महाप्रसादाचे नियोजन, व्यवस्थापन तसेच इतर आवश्यक कामांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा.
गावातील सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये ते उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने त्यांचा मोठा मित्रपरिवार निर्माण झाला होता. मनमिळावू स्वभाव, सर्वांशी आपुलकीने वागण्याची पद्धत आणि सहकार्याची भावना यामुळे ते ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या अचानक जाण्याने ग्रामस्थांनी एक जिवलग मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त केली.उमेश राणे यांच्या निधनाने राणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात येत आहे. त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यातील योगदानाच्या आठवणी ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात आहेत.



