


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात पार पडली. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोडतीत अनुसूचित जातीसाठी ८, अनुसूचित जमातीसाठी २१, नामाप्र (OBC) प्रवर्गासाठी २ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी तब्बल ३२ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.
यावल तहसील कार्यालयात झालेल्या या आरक्षण सोडत कार्यक्रमाकडे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले होते. आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध गावांमधील राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी एकूण ८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये वनोली, दुसखेडे, न्हावी प्र. यावल, अंजाळे, निमगाव, किनगाव बु., मोहराळे आणि डांभुर्णी या गावांचा समावेश आहे.
अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी २१ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये बोराळे, वड्री खु., कोरपावली, म्हैसवाडी, कासवे, शिरसाड, मनवेल, कोसगाव, सांगवी खु., पिळोदे खु., मारुळ, बामणोद, पाडळसे, साकळी, विरोदे, हंबर्डी, बोरावल खु., पिळोदे बु., चिखली बु., चितोडे आणि राजोरे या गावांचा समावेश आहे. नामाप्र (OBC) प्रवर्गासाठी दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद निश्चित करण्यात आले असून, भालशिव आणि दहिगाव या गावांचा त्यात समावेश आहे.
तर सर्वसाधारण (OPEN) प्रवर्गासाठी तालुक्यातील उर्वरित ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अट्रावल, डोंगर कठोरा, सांगवी बु., चिखली खु., चिंचोली, शिरागड, बोरखेडा बु., डोणगाव, नावरे, सावखेडे सिम, थोरगव्हाण, न्हावी प्र. अडावद, वढोदे प्र. यावल, बोरावल बु., पिंपरुड, टाकरखेडे, आडगाव, हिंगोणे, आमोदे, भालोद, चुंचाळे, गिरडगाव, नायगाव, पिंप्री, सातोद, उंटावद, वढोदे प्र. सावदा, कासारखेडा, किनगाव, कोळवद, आणी, महेलखेडी आणि विरावली या गावांचा समावेश आहे.
दरम्यान, सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महिला आणि पुरुष सरपंचपदाची आरक्षण सोडत ८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी बबन काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत होणार आहे. त्यामुळे कोणत्या गावातील सरपंचपद महिलांसाठी राखीव राहणार आणि कोणत्या ठिकाणी पुरुषांसाठी संधी उपलब्ध होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकूणच, यावल तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण स्पष्ट झाल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. विशेषतः ३२ ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या गावांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.



