


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील हॉस्पीटल व धर्मार्थ रूग्णालयाच्या जवळ रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी करण्यात आली असून यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी श्रमदानाची तयारी देखील दाखविली आहे.
भुसावळ-भादली रेल्वे मार्गावर गोदावरी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय परिसरात (जळगाव खुर्द) प्रस्तावित रेल्वे थांबा त्वरित मंजूर करण्यात यावा, यासाठी परिसरातील नागरिक आणि विविध सामाजिक घटकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रलंबित रेल्वेस्थानकाच्या उभारणीसाठी परिसरातील सात गावांतील ग्रामस्थांनी स्वतः श्रमदान करण्यासह प्रकल्पाच्या एकूण खर्चातील निम्मा (५० टक्के) भार उचलण्याची तयारी दर्शवली आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी दुपारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
वाहतूक व्यवस्थेअभावी विद्यार्थी, रुग्णांचे हाल
विद्यमान भादली रेल्वेस्थानक जळगाव खुर्द गावापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर आहे; मात्र गेल्या चार वर्षांत जळगाव खुर्द परिसरातील एकाही प्रवाशाला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. या परिसरात गोदावरी फाउंडेशनची वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर महाविद्यालये तसेच मोठे रुग्णालय कार्यरत आहे. त्यामुळे दररोज सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येथे ये-जा करतात. याशिवाय परिसरातील सात गावांची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावामुळे या सर्व घटकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दोन कोटींचा प्रस्ताव लालफितीत
या प्रस्तावित रेल्वे थांब्यासाठी २०११ पासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. २१ एप्रिल २०११ रोजी रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानंतर २७ मे २०११ रोजी रेल्वे बोर्डाने महाव्यवस्थापक व भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (DRM) प्रस्तावाची तांत्रिक तपासणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाहीचे थेट निर्देश दिले होते. २०१२ मध्ये सव्वा दोन कोटी रुपयांच्या खर्चातून जळगाव खुर्द येथे रेल्वेस्थानक उभारण्याला तत्वतः मंजुरीही मिळाली होती. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे हा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रखडला. आता खासदार स्मिता वाघ यांच्या माध्यमातून केंद्र स्तरावर या प्रस्तावाला नव्याने गती देण्यात येत आहे.
‘हॉल्ट पॉलिसी’तून सूट देण्याची मागणी
भुसावळ ते भादली दरम्यान किमी क्र. ४३५ ते ४३६ दरम्यान हा थांबा होणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सोयीचे आहे. प्रवाशांची प्रचंड संख्या आणि रुग्णांची निकड लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने दोन स्थानकांमधील अंतराच्या ‘हॉल्ट पॉलिसी’ नियमातून विशेष बाब म्हणून सूट द्यावी आणि हा थांबा तातडीने कार्यान्वित करावा, अशी रास्त मागणी उपस्थित प्रतिनिधींनी केली. तसेच, हे रेल्वेस्थानक अस्तित्वात आल्यास त्यास खान्देशच्या थोर सुपुत्री ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ (बहिणाबाईनगर) यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्तावही या वेळी मांडण्यात आला.
पत्रकार परिषदेस मान्यवरांची उपस्थिती
या पत्रकार परिषदेस गोदावरी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी, चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माणिक पाटील, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, जळगाव खुर्द ग्रामपंचायत सदस्य कुंदन पाटील, आसोदा ग्रामपंचायत सदस्य शरद नारखेडे, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी मनस्वी गोयल, शिवानी चव्हाण, शेख मोहम्मद अजीज आणि अर्शद खान आदी उपस्थित होते.



