Home Cities जळगाव महामार्ग अपघातांतील मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई द्या; महापौर दीपमाला काळेंची मागणी

महामार्ग अपघातांतील मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई द्या; महापौर दीपमाला काळेंची मागणी

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर झालेल्या प्राणांतिक अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कायदेशीर वारसांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शासकीय पातळीवर तातडीने संयुक्त कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महापौर दीपमाला काळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त तथा नुकसानभरपाई निर्धारण समितीचे अध्यक्ष यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.

नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महामार्गावरील अपघातांबाबत सविस्तर निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत महापौर काळे यांनी संबंधित अपघातांची अधिकृत नोंद तपासून मृतांच्या वारसांना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे. यासाठी पोलीस अभिलेख, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे प्रत्येक प्रकरणाची पडताळणी करण्याचे सुचविण्यात आले आहे.

पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर अवजड वाहतूक शहरातील विविध रस्त्यांवर वळविण्यात आल्याने शहरातील वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. संबंधित रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील असले, तरी ते महानगरपालिका हद्दीतून जात असल्याने अपघात प्रतिबंध आणि पीडितांना मदत मिळवून देण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे महापौरांनी नमूद केले आहे.

जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी संयुक्तपणे या प्रकरणांचा आढावा घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. प्रत्येक अपघातातील मृत नागरिकाच्या कायदेशीर वारसाची अधिकृत माहिती निश्चित करून स्वतंत्र नुकसानभरपाई प्रस्ताव तयार करावा. आवश्यक कागदपत्रे, अहवाल आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या शिफारशींसह हे प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नुकसानभरपाई निर्धारण समिती किंवा अन्य सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महानगरपालिकेला थेट नुकसानभरपाई मंजूर करण्याचे अधिकार नसल्यास संबंधित प्रस्ताव फेटाळून न लावता ते जिल्हाधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा अन्य सक्षम प्राधिकरणाकडे सकारात्मक शिफारशीसह वर्ग करण्यात यावेत, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी समन्वय आणि पाठपुरावा करण्याकरिता नोडल अधिकारी नियुक्त करण्याबाबतही विचार करावा, अशी सूचना महापौरांनी केली आहे.

दरम्यान, केवळ नुकसानभरपाईपुरती कार्यवाही न करता अपघातांच्या कारणांचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित महामार्ग व शहरातील रस्त्यांची स्थिती, खड्डे, बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, पथदिवे तसेच वाहतूक नियोजनाची संयुक्त पाहणी करावी. त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकारी अथवा कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कार्यवाही करावी, असे महापौरांनी सुचविले आहे.

अंतिम नुकसानभरपाईचा निर्णय होण्यास वेळ लागण्याची शक्यता लक्षात घेता, तोपर्यंत अपघातग्रस्त मृतांच्या कुटुंबीयांना अंतरिम आर्थिक मदत देता येईल का, याची कायदेशीर शक्यताही तपासण्यात यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातात कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळू शकतो.

“नगरसेवक अरविंद देशमुख यांनी उपस्थित केलेला विषय गंभीर व जनहिताचा आहे. संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून पात्र कायदेशीर वारसांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी,” अशी विनंती महापौर दीपमाला काळे यांनी केली आहे.

या प्रकरणात संबंधित विभागांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल महापौर कार्यालयासह अर्जदार नगरसेवक अरविंद देशमुख यांना उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षाही महापौरांनी व्यक्त केली आहे. महामार्गावरील अपघातांमध्ये जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि समन्वयाने कार्यवाही करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

 


Protected Content

Play sound