केंद्रीय वित्त आयोगाच्या दौऱ्यात उमेश नेमाडे करणार भुसावळ नगरपालिकेचे प्रतिनिधीत्व !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय वित्त आयोगाच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्यात माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे हे भुसावळ नगरपालिकेचे प्रतिनिधीत्व करणार असून या संदर्भातील बैठकीत त्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला आहे.

१६व्या केंद्रीय वित्त आयोगाचा महाराष्ट्र दौरा दिनांक ८ व ९ मे २०२५ रोजी होणार आहे. या दौऱ्यात ८ मे रोजी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी विशेष बैठक मंत्रालयामार्फत आयोजित करण्यात आली आहे. यासाठी शासनाने भुसावळ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उमेश कालिदास नेमाडे यांची प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. ही निवड शहराच्या प्रशासकीय व राजकीय पातळीवर मोठी जबाबदारी मानली जात आहे.

या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी २ मे रोजी सकाळी ११:३० वाजता प्रधान सचिव (नगर २), नगरविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वाची पूर्वसमीक्षा बैठक झाली. या बैठकीत वित्त आयोगाच्या मुख्य मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर चर्चेत भुसावळ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी आयोगासमोर शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यात नागरी संस्थांची सध्याची आर्थिक स्थिती, आयोगाच्या निधीतून राबवण्यात आलेल्या योजनांचे प्रभाव, अंमलबजावणीतील अडथळे व त्यावरील उपाययोजना तसेच भविष्यातील महत्त्वाचे प्रकल्प यांचा समावेश होता.

मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनीदेखील शहराच्या गरजांवर सखोल विवेचन करत उपयुक्त मुद्दे उपस्थित केले. दोघांनी मिळून प्रधान सचिवांसमोर भुसावळच्या विकास आराखड्यावर ठोस चर्चा घडवून आणली. या संदर्भात उपमुख्य अधिकारी शेख परवेज अहमद यांनी माहिती देताना सांगितले की, केंद्रीय वित्त आयोगाच्या माध्यमातून प्राप्त होणारा निधी भुसावळ शहराच्या भावी योजनांसाठी मार्गदर्शक ठरेल. या निधीतून शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सेवा योजनांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

Protected Content