पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समाज कल्याण विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनावरून ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत पाचोरा पंचायत समिती कार्यालयात दिव्यांग लाभार्थ्यांना गट विकास अधिकारी अतुल पाटील यांच्याहस्ते दिव्यांग कक्षात यु. डी. आय. डी. कार्डाचे वाटप करण्यात आले.
यावेळी तहसिलदार कैलास चावडे आणि दिव्यांग कक्ष अधिकारी काशिनाथ महाले यांच्याहस्ते दिव्यांग लाभार्थी सुरेखा आहिरे, कैलास सुरपाटणे, अण्णा पाटील, संगीता ठाकूर, खंडू अहिरे व इतर दिव्यांग लाभार्थी यांना यु. डी. आय. डी. कार्डाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय देवकर, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी ए. पी. बागुल, अमोल पाटील, कनिष्ठ सहाय्यक किरण गोसावी, पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक संजय पाटील व मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या व्यंगाचा विचार करता त्यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास होणार नाही याचा विचार करून पाचोरा पंचायत समितीचे कक्ष अधिकारी ए. टी. महाले यांनी त्यांना समाज कल्याण प्रशासनाकडून प्राप्त झालेली युनिक आय. डी. (दिव्यांग प्रमाणपत्र) कार्ड यापूर्वी पाचोरा तालुक्यातील गावोगावी जावुन भेटी देवून वाटप केलेले आहेत.
शासन नियमानुसार जुनी असलेली दिव्यांग प्रमाणपत्र ही ऑनलाइन म्हणजेच सुधारित युनिक आय.डी. प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. हे कार्ड असल्यावरच कुठल्याही योजनेचा लाभ दिव्यांगांना दिला जाईल हा शासकीय स्तरावरून आदेश आहे. जिल्हा प्रशासनाने पोस्टामार्फत पाठवली जाणारी युनिक आय.डी. कार्ड आता पंचायत समिती कार्यालयाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंचायत समिती, पाचोरा दिव्यांग कक्ष अधिकारी ए. टी. महाले यांचेकडून दिव्यांग लाभार्थी यांच्या घरी जाऊन यु. डी. आय. डी. कार्ड वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सदर कार्यक्रमास पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे प्रतिनीधी व पाचोरा प्रहार दिव्यांग संस्थेचे प्रतिनीधी उपस्थित होते.