मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसात भेटणार असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्या दीपाली सैयद यांनी केला आहे.
राज्यातील अलीकडच्या काळच्या घटनांमुळे ठाकरे आणि शिंदे यांच्यात वितुष्ट आले आहे. या पार्श्वभूमिवर, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्यासंदर्भात शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सदर भेटीसाठी मध्यस्थी केल्याबद्दल भाजपचे धन्यवाद देखील मानले आहेत. यात पुढे म्हटले आहे की, येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं ट्वीट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.
दरम्यान, दीपाली सय्यद यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यात करण्यात आलेल्या दाव्यानुसार ठाकरे आणि शिंदे खरोखरच एकमेकांना भेटणार का ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तर दुसरीकडे दोन्ही गटांचे ताणलेले संबंध पाहता ही बाब तूर्तास तरी शक्य नसल्याचे अनेक राजकीय अभ्यासकांचे मत आहे.