एरंडोल-रतीलाल पाटील | एकीकडे उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये तुफान चुरस सुरू असतांनाच एरंडोल शहराचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्या कुटुंबात यामुळे ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सोशल मीडियात हा चर्चेचा विषय बनला आहे.
एरंडोल येथील माजी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन ह्या आमच्या गटाच्या नवीन पदाधिकारी असल्याचा फोन त्यांचे पती माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांना खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयातून आला व त्या नवीन यादीत नवीन पदाधिकारी असल्याचे फोनवर सांगितल्याने दशरथ महाजन यांनी शिंदे गटाकडून राज्यात फूट पाडल्यानंतर आता परिवारात देखील फूट पाडण्याचे प्रयत्न शिंदे गट करीत असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.
एरंडोल येथील माजी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन यांच्या पतीच्या मोबाईलवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयातून फोन आला. यात समोरून बोलणार्या महिलेने कल्पना महाजन या खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या गटाच्या नवीन पदाधिकारी असून त्यांच्या क्रमांकाची खात्री करण्यासाठी आपणास फोन केल्याचे सांगितले.त्यावर दशरथ महाजन यांनी तुम्हाला माझा फोन नंबर कोणी दिला ? असा प्रश्न केला असता सदर कार्यालयातील प्रतिनिधी महिला निरुतर झाल्या.
दरम्यान, संबंधीत कॉल करणार्या महिलेने आम्हाला साहेबांच्या नवीन पदाधिकारी यादीत तुमचे नाव आलेले आहे असे सांगितले. यावर दशरथ महाजन यांनी कुठल्या साहेबांच्या यादीत नाव आले आहे असा प्रश्न केल्यावर खा. डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या यादीत आपले नाव आले आहे.असे सांगताच दशरथ महाजन यांनी आश्चर्याने आपले नाव कसे आले ? असे विचारल्यावर महिला प्रतिनिधीने कल्पना दशरथ महाजन यांचे नाव आले असल्याचे सांगितले.
यावर दशरथ महाजन यांनी आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उपजिल्हाप्रमुख असल्याचे सांगितले .यावरही महिला प्रतिनिधी यांनी दशरथ महाजन यांना तुमच्या पत्नी कल्पना महाजन या कोणत्या गटाच्या आहेत ? असा प्रश्न केल्याने दशरथ महाजन अधिकच संतापले व मला माझ्या बायकोने कधी हे सांगितले नाही की ती कोणत्या गटाची आहे आता तुम्हाला माहिती असल्याने तुम्हीच सांगावे की ती कोणत्या गटाची आहे? असे उत्तर दिले. त्यानंतर सुद्धा महिला प्रतिनिधीने आपल्या शिकाऊ प्रश्नांची सरबत्ती सुरू ठेवल्याने महाजन अधिकच संतप्त झाले. यानंतर त्यांनी आपण राज्यात फूट पाडून व परिवारात देखील फूट पाडण्याचे काम थांबवावे असे ठणकावले.
एरंडोलचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना-उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांनी या संभाषणाची क्लीप सोशल मीडियात व्हायरल केल्यानंतर यावर मोठी चर्चा घडून येत आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने दशरथ महाजन यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत शिंदे गट हा माझ्या कुटुंबात फूट पाडत असल्याचा सनसनाटी आरोप केला. याबाबत श्री. महाजन म्हणाले की, सध्या राजकारण मोठ्या प्रमाणात दूषीत झाले असून राज्यात ही सुख नांदू देत नाही व आता परिवारातही तुम्ही फुट पाडत आहात का ? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे.
दशरथ महाजन पुढे म्हणाले की, आम्ही ठाकरे गटाचे असून दिशाहीन असलेले सरकार आपल्या मागे जनता असल्याचे भासवून खोटे नाटे फोन करून आधी राज्यात फूट टाकली आता परिवारात देखील खोटेनाटे फोन करून पती व पत्नी यांच्यात भांडणे लावून फूट पाडण्याचे काम करीत असल्याचे व आपले पदाधिकारी असल्याचे भासवत असल्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दाखवत असल्याचे म्हटले आहे. जनता यांच्या मागे जाणार नाही व यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. काही लोक आपल्या स्वार्थासाठी ५० कोटी रुपये घेऊन त्यांच्यासोबत गेले. आम्ही स्वाभिमानी असून शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, लाईव्ह ट्रेंडस न्यूजने याप्रसंगी दशरथ महाजन यांच्या सौभाग्यवती तथा माजी नगरसेविका कल्पना महाजन यांना देखील या प्रकाराबाबत विचारणा केली. यावर त्या म्हणाल्या की, मी माझा परिवार पहिल्यापासून बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असून त्यांच्या विचाराशी बांधील आहोत. माझा परिवार पूर्वीपासून शिवसेनेत होता आणि आहे भविष्यात देखील उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहू.मी शिंदे गटात पदाधिकारी आहे असे भासवून माझी व माझ्या परिवाराची निष्ठा डगमगते की काय ? याची चाचपणी करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिंदे गटाकडून केले जात असून त्यांच्या या कृतीचा मी धिक्कार व निषेध करते.असे म्हटले आहे.
व्हिडीओत पहा : दशरथ महाजन यांनी याबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/679234193714656