सेवानिवृत्त सहायक फौजदाराची तीन लाख रुपयांमध्ये फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सोन्याचे कॉइन घेण्याचे आमिष दाखवत सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराला ३ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरुषोत्तम सुपडू लोहार (६३, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) हे पोलिस दलात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्याकडे निवृत्ती वेतनाची रक्कम जमा झालेली होती. त्यावेळी मुंबई येथील भैया पाटील व कामता सोनी या नावाच्या दोन व्यक्तींनी लोहार यांच्याशी ओळख निर्माण केली. भैया पाटील यांनी शहरातील एका नामांकीत हॉटेलमध्ये बोलवून त्यांना गुंतवणुकीचे अमिष दाखविले. त्यानंतर त्यांना कंपनीत सोन्याचे कॉइन घेऊन कंपनीत गुंतवणूक करण्याचे सांगून एक आयडी दिला त्यामध्ये दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळेल असे सांगण्यात आले त्यानंतर वेळोवेळी ३ लाख १ हजार रुपये त्यांच्याकडून दोघांनी घेतले. परंतु मात्र कोणतीही फायदा मिळाला नाही, तसेच पैसे मागून देखील परत मिळाले नाही, दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन जणविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content