मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जगद्गुरू शंकराचार्य यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली होती. त्यानंतर आता शंकराचार्य आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर आता श्री पंचनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते महंत नारायणगिरी यांनी निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते. पण उद्धव ठाकरे यांनीच धोका दिला असे विधान त्यांनी केले आहे.
महंत नारायणगिरी महाराज म्हणाले की, ”श्रीशंकराचार्यजी उद्धव ठाकरेंकडे गेले होते. शंकराचार्य साधारण व्यक्तींकडे कधी जात नाही. मात्र उद्योगपती मोठ्या विवाहात जातात. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिला. नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारधारेला तिलांजली दिली आणि विरुद्ध विचारधारेसोबत ते गेलेत. शंकाराचार्य अशा लोकांच्या घरी जाऊन म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंना धोका दिला. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाला धोका दिला”, असे त्यांनी म्हंटले आहे.
पुढे बोलतांना ते असेही म्हणाले, ”शंकराचार्यंचा आदर करतो, धर्म आणि राष्ट्रापेक्षा कोणताही संत मोठा नसतो. जय -पराजय हे आम्ही सांगायला नको. ते काम जनतेचं आहे. आमचे काम पूजापाठ करण्याचे आहे. आम्ही कोणाला धोकेबाज म्हणतो, विश्वासघातकी म्हणतो, अशी विधानं देताना विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरे विद्रोहीसोबत गेले आहेत. त्यांच्या घरी जात त्यांना आशीर्वाद देणे आणि भेट घेणे चुकीचं आहे”, असे मत देखील महंत नारायणगिरी यांनी व्यक्त केले.