साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । वाघूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आज सकाळी साकेगावातील दोन महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही सासू-सुना असून आता त्यांचा शोध घेतला जात आहे.
याबाबत वृत्त असे की, वाघूर नदीच्या पात्रात सध्या तुलनेत कमी पाणी आहे. काही दिवसांपूर्वी नदी पात्र दुथडी भरून वाहत असले तरी सध्या पाऊस नसल्याने पात्रात कमी पाणी आहे. या पार्श्वभूमिवर, येथील सिंधूबाई अशोक भोळे (वय, अंदाजे ६५) आणि योगिता राजेंद्र भोळे (वय, सुमारे ३५ वर्ष) या दोन महिला आज सकाळी नदी पात्रात गेल्या होत्या. त्या काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या वरील बाजूस गेल्या होत्या. त्या दररोज या भागात जाऊन वाळू गाळण्याचे काम करत होत्या. यानुसार त्या आज देखील सकाळी गेल्या होत्या.
दरम्यान, धरणातून पाणी सोडल्यामुळे अचानक पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढू लागला. यामुळे त्या घाबरून तुलनेत उंच ठिकाणी असणार्या भागावर जाऊन मदतीसाठी धावा करू लागल्या. तथापि, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्या वाहून गेल्या. यावेळी पुलावर असणार्या काही जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी यात त्यांना यश आले नाही. अवघ्या काही मिनिटांमध्ये त्या पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेल्या. ही माहिती गावात मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही महिलांचा शोध घेण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे.
सिंधूबाई अशोक भोळे यांची योगिता राजेंद्र भोळे ही सून होती. या दोन्ही साकेगावातील मशिदीच्या मागे राहत होत्या. त्यांची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने नदी पात्रात वाळू गाळून त्या उदरनिर्वाह चालवत होत्या. अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे दोन्हींच्या पतीचे निधन झालेले आहे. योगिता हिला एक मुलगा व एक मुलगी असून ते शाळेत जातात. आज सकाळच्या दुर्घटनेत त्यांची आई व आजी वाहून गेल्याने त्यांच्यावर संकटाचा डोंगर कोसळला आहे.