जळगाव प्रतिनिधी । बांभोरी कॉलेजमधून मित्रासोबत घरी येत असतांना मागुन येणाऱ्या ट्रकने कट मारल्याने दुचाकीवरील 19 वर्षीय तरूण ट्रकच्या मागच्या चाकात येवून जागीच ठार झाल्याची घटना आहुजा नगर येथे आज सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घडली. तर दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, सौरभ गोपालदार मालवाणी (वय-19) रा. सिंधी कॉलनी, हनुमान नगर, भुसावळ हा बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. शिक्षण घेण्यासाठी सौरभ दुचाकी क्रमांक (एमएच 19 डीके 8303)ने भुसावळहून रोज येजा करत होता. सायंकाळी महाविद्यातून जळगावात मित्र हर्षल शांताराम सपकाळे सोबत दुचाकीवरून येत होता. यावेळी दुचाकी हर्षल चालवत होता तर पाठीमागे सौरभ बसलेला होता. अहुजा नगर येथे मागुन अचानकपणे ट्रक क्रमांक (जीजे 12 वाय 9262) आला. यावेळी ट्रकचा मागचा भागाचा कट लागल्याने दुचाकीवर बसलेला सौरभ ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी हर्षलला जखम झाली आहे.
सौरभच्या कुटुंबियांना महाविद्यालयाच्या ओळखपत्रावरून मयताची ओळख पटली. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक इस्माईल गनीभाई भादूला रा. भावनगर यांने ट्रक सरळ तालुका पोलीसात जमा केला. मयत सौरभचे वडीलांचे भुसावळात ड्रायफुडचे दुकान आहे. वडील, भाऊ स्वयंम आणि आई लक्ष्मी असा परीवार आहे. मुलाचा मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला होता. घटनास्थळी तालुका पोलीसांनी धाव घेतली होती. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात प्रचंड गर्दी जमली होती. याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.