नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विदर्भाचा झेंडा घेऊन विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन विदर्भवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विदर्भवादी धडक मोर्चाने येऊन विधानभवनावर वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवणार असल्याने परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. आता १० ऑगस्ट रोजी नागपूर येथील विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवण्याचा निर्णय नागपूर जिल्हा व महानगर कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
विदर्भ राज्य निर्मितीसाठी आणि विदर्भातील नागरिकांवरील अन्याय संपवण्याच्या दृष्टीने नव्या केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी “महाराष्ट्रवादी चले जाओ”चा नारा देत समिती पुन्हा रणशिंग फुंकणार आहे. या आंदोलनापूर्वी समितीचे कार्यकर्ते यशवंत स्टेडियम येथे १० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता एकत्र आले. त्यानंतर समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विधानभवनापर्यंत लाँगमार्चद्वारे निघाले. परंतु तत्पूर्वीच विधानभवनापासून १ किमी आधीच टेकडी रोडवर पोलिसांनी मोर्चा अडवला. त्या नंतरही पोलिसांना चकवून विधान भवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न दोन कार्यकर्त्यांनी केला असता पोलिसांनी त्यांना अटक केली.