दया, कुछ तो गडबड जरूर है; संजय राऊतांना शंका

 

 

 मुंबई : वृत्तसंस्था ।  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करत छापेमारीही सुरू केली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. राऊत यांनी ट्विट करत ‘दया, कुछ तो गडबड जरूर है,’ असं म्हटलं आहे.

 

राजकीय वर्तुळात अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईने खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.  तपास सुरू असतानाच सीबीआयने अनिल देशमुख यांच्यासह संबंधित   इतरांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर देशमुख यांच्या घर आणि कार्यालयांची झाडाझडती सुरू असून, या कारवाईवर राऊत यांनी ट्विट करत शंका बोलून दाखवली आहे.

 

संजय राऊत यांनी ट्विट करत न्यायालयाचे आदेश आणि सीबीआयची कारवाई याच्या तफावत असल्याचं सांगत धाडी टाकणं अतिरेक असल्याचं म्हटलं आहे. “कुछ तो गडबड है…  उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुखांवर धाडी. एफ.आय.आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया..कुछ तो गडबड जरूर है,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Protected Content